मुंबई :

शेतीमधील तुटपुंजे उत्पन्न, डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा आणि त्यातच मुलीच्या विवाहाची चिंता या कारणावरून राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बळीराजाच्या डोक्यावरील मुलीच्या विवाहाची चिंता दूर व्हावी यासाठी मुंबईतील सर्व धार्मिक स्थळे पुढे सरसावली आहेत. या प्रार्थनास्थळांच्या विश्वस्तांनी एकत्र येऊन नुकतीच ‘सामूहिक विवाह सोहळा समिती, मुंबई’ची स्थापन केली असून, या समितीच्या माध्यमातून गरीब शेतकरी व दुर्बल घटक तसेच आदिवासी समाजातील मुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. येत्या १२ मे रोजी पहिला सामूहिक विवाह सोहळा पार पडणार असून, यावेळी किमान १०० मुलींचा विवाह लावून देण्यात येईल.

धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमधील सर्व जातीधर्माच्या धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक वरळी येथील त्यांच्या कार्यालयात बोलाविली होती. या कामासाठी मदतीचा हात पुढे करण्याची विनंती या धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना त्यांनी केली. त्यानुसार एक परिपत्रकही काढले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, धर्मादाय कार्यालय व बोरिवलीतील श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळ (वझिरा नाका) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात नुकतेच एक चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्राला मुंबईतील अनेक धार्मिक स्थळांचे विश्वस्त व धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ठरल्यानुसार, ‘सामूहिक विवाह सोहळा समिती, मुंबई’ची स्थापना करण्यात येऊन अलीकडेच धर्मादाय आयुक्त कार्यालयात त्याची नोंदणी करण्यात आली.

समितीचे अध्यक्ष म्हणून विजय दारुवाले यांची निवड करण्यात आली आहे. तर यामध्ये प्रकाश कारखानीस (उपाध्यक्ष), अमित मेहता (सचिव), मनीष मजेठीया (खजिनदार) यांच्यासह एकूण दहा सदस्य आहेत. मुंबईतील सर्व धार्मिकस्थळांच्या बाहेर याबाबतची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. मुंबईतील सर्वच प्रमुख धार्मिक स्थळांकडे जाऊन जास्तीत जास्त मदत गोळा करण्यात येईल, अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली.

बोरिवलीतील श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळ (वझिरा नाका, बोरिवली), अंबाजी धाम-बोरिवली, स्वामी समर्थ मठ-दादर, गणेश विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज-चेंबूर, धर्मादाय आयुक्त कार्यालय या ठिकाणी याबाबतची सर्व माहिती उपलब्ध असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here