अल्जीयर्स:

आफ्रिका खंडातील अल्जेरियामध्ये आज सकाळी लष्कराचं विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत १०० हून अधिक लोक ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विमानात अल्जेरियन सैनिक मोठ्या प्रमाणावर होते, असं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान अल्जेरियन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.

अल्जेरियाची राजधानी अल्जीयर्सपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बॉफेरीक लष्करी विमानतळावर आज सकाळी ही दुर्घटना घडली. हे विमान दक्षिण-पश्चिमी अल्जेरियाकडे जात होतं. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मदत कार्यासाठी १४ रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या १० गाड्या रवाना झाल्या आहेत. या दुर्घटनेत विमानातील कोणीच बचावलं नसल्याचं ‘अल अरेबिया’ या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २०० हून अधिक असण्याची शक्यता आहे.

या विमानातून सैनिकांसोबत काही उपकरणेही नेण्यात येत होती. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजता ही दुर्घटना घडली. मदत कार्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून या घटनेनंतर लष्करी विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत, असं ‘गोल्फ न्यूज’ने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here