गोल्ड कोस्ट:

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घोडदौड सातव्या दिवशीही कायम आहे. महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजी प्रकारातही आज भारताला ‘सुवर्ण’ यश मिळालं आहे. नेमबाज श्रेयसी सिंह हिने आपल्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी करत डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदकाची कमाई केली.

राष्ट्रकुलमध्ये आजच्या दिवसातलं भारताचं हे दुसरं पदक ठरलं. ओम मिथरवालने ५० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. २०१४ साली ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या श्रेयसी सिंह हिच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष होतं. यंदा लौकिकाला साजेशी कामगिरी करणाऱ्या श्रेयसीच्या मेहनतीला सोनेरी कोंदण प्राप्त झाले. श्रेयसीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे भारतीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे. दुसरीकडे याच स्पर्धेत २३ वर्षीय वर्षा वरमान हिचं मात्र कांस्य पदक हुकलं. वर्षाला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

श्रेयसीने पहिल्या फेरीपासूनच दबदबा कायम ठेवत २४, २५, २२ आणि २५ अशा गुणांसह पहिलं स्थान गाठलं. श्रेयसीच्या पदकानंतर राष्ट्रकुलमध्ये भारताच्या पदकांची संख्या आता २३ वर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here