डोक्यात दगड टाकून महिलेचा खून; आरोपीला १२ तासांत भायखळा पोलिसांनी केले गजाआड

56

डोक्यात दगड टाकून महिलेचा खून; आरोपीला १२ तासांत भायखळा पोलिसांनी केले गजाआड.

डोक्यात दगड टाकून महिलेचा खून; आरोपीला १२ तासांत भायखळा पोलिसांनी केले गजाआड.
डोक्यात दगड टाकून महिलेचा खून; आरोपीला १२ तासांत भायखळा पोलिसांनी केले गजाआड.

नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई /भायखळा:- भायखळा मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. सदर कारवाई भायखळा पोलिसांनी १९ मे रोजी केली. खून करून आरोपी गावी यूपीला पळण्याच्या तयारीत होता. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केल्यामुळे वरिष्ठांनी पोलीस पथकाचे आभार मानले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भायखळा पोलिसांचे पथक कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातून महिलेवर हल्ला झाल्याची माहिती बिनतारी संदेशाद्वारे प्राप्त झाली. त्यानुसार भायखळा पोलिसांनी तात्काळ मासिना हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलच्या बाहेरील फूटपाथवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याच अवस्थेत तिला जे जे रुग्णालयात पोलिसांनी नेले. मात्र त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी ( गु र क्र 319/2021) भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्याचा घटनस्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. अशा स्थितीत पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी उत्तर प्रदेशातील मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपीचा कसोशीने शोध घेऊन तो त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याचा तयारीत असताना भायखळा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी संतोष राम किशोर यादव याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने महिलेचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी हा रोडसाईड असून त्याचा मुंबईतील कोणताही कायमचा रहिवासी पत्ता नसल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्ह्याची उकल सहाय्यक पोलीस आयुक्त पवार, भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरेकर, पोलीस उपनिरीक्षक रूपेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, आदी पथकाने केली.