म्युकरमायकोसिस, पेडियाट्रीक-कोविड आजारासाठी प्रशासनाने उपाययोजना तयार करावी: डॉ. नितीन राऊत

53

म्युकरमायकोसिस, पेडियाट्रीक-कोविड आजारासाठी प्रशासनाने उपाययोजना तयार करावी: डॉ. नितीन राऊत

दुसऱ्या लाटेचा आढावा ; तिसऱ्या लाटेसाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचे निर्देश; ग्रामीण रुग्णालयासाठी पंचवीस कोटींचा सामाजिक दायित्व निधी.

पेडियाट्रीक-कोविड आजारासाठी 700 बेड निर्माण करण्याचे आदेश; खासगी हॉस्पिटलनी महानगरपालिकेला तातडीने हिशेब सादर करावा.

टेस्टिंग लॅब खरेदीचे आदेश द्यावे; मेयो- मेडिकलच्या ग्रामीण भागाच्या रुग्णसेवेची आकडेवारी जाहीर करा.

म्युकरमायकोसिस रुग्णसेवेसाठी औषधोपचार पद्धत ठरवा; ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे नागपुरची वाटचाल गतिशील करण्याचे निर्देश.

रुग्णवाढ कमी झाल्याने बेसावध राहू नका; घराबाहेर पडू नका पोलिसांनी संयुक्त कारवाई कायम ठेवावी; रिकामटेकड्यांची चाचणी करावी

म्युकरमायकोसिस, पेडियाट्रीक-कोविड आजारासाठी प्रशासनाने उपाययोजना तयार करावी: डॉ. नितीन राऊत
म्युकरमायकोसिस, पेडियाट्रीक-कोविड आजारासाठी प्रशासनाने उपाययोजना तयार करावी: डॉ. नितीन राऊत

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
नागपूर :- म्युकरमायकोसिस, पेडियाट्रीक-कोविड आजारासाठी महानगर व जिल्हा प्रशासनाने
वेळीच सर्व उपाययोजना कराव्यात. लहान मुलांसाठी किमान सातशे बेड उपलब्ध करण्यात यावेत. ग्रामीण रुग्णालय सक्षम करण्यासाठी तसेच कोविड रुग्णांसाठी पंचवीस कोटी रुपयांचा सामाजिक दायित्व निधी वापरावा. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना कोविड नंतरच्या या आजारातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे दिले.

शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नागपूर जिल्ह्यातील कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी.एस.सेलोकार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष अनुप मराठे, डॉ. अभिमन्यू निस्वाडे, डॉ. दीप्ती जैन, डॉ.मिनाक्षी गिरिष, डॉ. मिलिंद भुरसंडी,कोविड, म्युकरमायकोसिस, पेड्रॉटीक टास्क फोर्सचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.

आजच्या बैठकीत संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांच्या आजाराला नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजनांवर प्रामुख्याने चर्चा झाली. सध्या प्रशासनाकडे साडेतीनशे बेड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ही संख्या 700 पर्यंत वाढविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यासाठी ऊर्जा विभागातील सामाजिक दायित्व निधी मधून पंचवीस कोटी रुपये पालकमंत्री उपलब्ध करून दिले आहेत.

म्युकरमायकोसिस उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या लसीला उपलब्ध करणे केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहे. मात्र त्याची पर्याप्त मात्रा उपलब्ध होत नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भातील पाठपुरावा करण्यात यावा. टास्क फोर्सच्या माध्यमातून वितरणाची बिनचूक व पारदर्शी पद्धत तयार करण्यात यावी. तसेच या आजारासाठी विशिष्ट लस मिळेपर्यंत, पर्यायी औषधोपचाराची रणनीती डॉक्टरांनी निश्चित करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी बेसावध राहू नये. लगतच्या अमरावती येथील कोरोना काळातील अनुभव ताजा असून त्या ठिकाणी रुग्ण संख्या कमी झाल्या नंतर अचानक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढायला लागली. ही परिस्थिती नागपुरात पुन्हा उद्भवू नये, यासाठी चाचणी करणे, तपासणी करणे, लसीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महानगरपालिका क्षेत्र व जिल्हा क्षेत्रामध्ये चाचणी, तपासणी, लसीकरण सातत्यपूर्ण ठेवा. नागरिकांना घराबाहेर निघू देऊ नका. पोलिसांनी रिकामटेकड्यावरची कारवाई आणखीन गतिशील करावी. तसेच नागरिकांनी देखील मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, सहा फुटाची सामाजिक दुरी पाळणे सुरु ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

विविध वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी आजच्या बैठकीला मोठ्या प्रमाणात होते. महानगरपालिक मार्फत तक्रार करण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या हिशेबाची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याबाबत आजच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. राऊत यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान शहरातील खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सामाजिक दायित्वातून केलेल्या मदतीबद्दल कौतुक केले. मात्र वैद्यकीय समुदायातील काही लोकांनी यावेळी चुका केल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे काही मोजक्या डॉक्टरांच्या गैरवर्तनाचा दोन्ही लाटेत काम करणाऱ्या खाजगी डॉक्टरांच्या मेहनतीवर, प्रतीमेवर व प्रयत्नांवर विरजण पडू नये. तसेच डॉक्टर संघटनांनी शासकीय निर्देशानुसार महानगरपालिकेला मागणीप्रमाणे हिशेब सादर करावा,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी विविध वैद्यकीय संघटनांच्या डॉक्टरांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. प्रशासन या कामाची योग्य नोंद घेत असल्याचे सांगितले.

दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना बेड न मिळाल्याची तक्रार आहे. मेडिकल व मेयोत या काळात ग्रामीण रुग्णांवर झालेल्या उपचाराची आकडेवारी जाहीर करावी. तसेच मेडिकल मधील प्रयोगशाळा ( टेस्टींग लॅब ) लवकर सुरू करण्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना नंतर आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बदल होणे आवश्यक आहे. कोरोना पुन्हा येऊ शकतो ही जाणीव ठेवून ऑक्सिजनच्या उपलब्धतेत नागपूर स्वयंपूर्ण करणे मुख्य उद्देश ठेवा. औषधांची उपलब्धता आणि ईएसआयसी,हज हाऊस व ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक केंद्र, जिल्हा उपकेंद्र आणि मोठ्या गावातील समाज मंदिर व शाळा याठिकाणी पर्यायी व्यवस्था उभी करता येईल. यासाठीचे आवश्यक यंत्र सामुग्री मनुष्यबळ ऑक्सिजनची उपलब्धता तयार ठेवण्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी जिल्ह्यात व्हाईट फंगस या नव्या रोगाची लक्षणे आहेत का ? महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसिसप्रमाणे, पेडियाट्रीक-कोविडचा समावेश करण्याची शक्यता, ऑक्सीजन प्लांटची सद्यस्थिती, सीएसआर निधीसाठी खाजगी कंपन्यांनी दिलेला प्रतिसाद, जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट ,म्युकरमायकोसिस, पेडियाट्रीक-कोविड लसींचा काळाबाजार आदी विषयांवर देखील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.