एटापल्ली “जांबिया”! सामान्य जनतेने सर्वाधिक लसीकरण केलेले एटापल्ली तालुक्यातील एक गाव.

48

एटापल्ली “जांबिया”! सामान्य जनतेने सर्वाधिक लसीकरण केलेले एटापल्ली तालुक्यातील एक गाव.

एटापल्ली "जांबिया"! सामान्य जनतेने सर्वाधिक लसीकरण केलेले एटापल्ली तालुक्यातील एक गाव.
एटापल्ली “जांबिया”! सामान्य जनतेने सर्वाधिक लसीकरण केलेले एटापल्ली तालुक्यातील एक गाव.

मारोती कांबळे, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एटापल्ली :- एटापल्ली या तालुक्याचे नाव घेताच डोळ्यासमोर येते – दुर्गम भाग, घनदाट जंगल, माडिया-गोंड आदिवासी, दळणवळणाच्या असोयी, भाषेची अडचण, मोबाईल नेटवर्कचा अभाव, रस्त्यांची दुर्दशा इत्यादी. एटापल्ली भाग हा महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमे लगतचा भाग. मुख्यतः माडिया, गोंड, परधान, हलबी आदिवासी बहुल तालुका. अशा या तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा या अंतर्गत येणाऱ्या जांबिया उपकेंद्र मधील जांबिया एक गाव. उपकेंद्रातुन मिळालेल्या अधिकृत माहिती नुसार आतापर्यंत जांबिया गावात, ४५ वर्षा वरील एकूण ८४ लोकांनी लसीकरण केले आहे. वरील वर्णन केलेल्या समस्या जांबिया गावामध्येही असतांना या गावाने असं काय वेगळं केलं ज्यामुळे येथे लसीकरणाचे प्रमाण वाढले. हे जाणून घेण्यासाठी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच अनेक स्थानीय प्रतिष्ठित लोकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

जांबिया गावातील गेल्या ३ वर्षांपासून भूमिया म्हणून जबाबदारी सांभाळणारे आणि कोविड-१९ लसीची पहिली मात्रा घेतलेले आदिवासी बांधव राजू हिचामी विश्वासाने म्हणाले, “गावातील सिस्टर (ए.एन.एम) व आशा ताईंवर आमचा खूप विश्वास आहे. त्या गावामध्ये घरोघरी जाऊन, आणि गोटुल मध्ये सुद्धा सहभागी होऊन लसीकरणासंबंधी खरी माहिती देत आहेत. त्यानुसार आमच्या ग्राम पंचायत मध्ये सर्वांनी एकमत होऊन लसीकरण करण्याचे ठरवले आहे व सर्वांचे लसीकरण घेणे सुद्धा सुरु आहे.”

कोविड-१९ लस संबंधी पसरलेल्या गैसमजुती बद्दल राजू हिचामी यांच्याशी चर्चा केली असता म्हणाले, “वरून(शासनाकडून) आलेले इंजेक्शन हे आपल्या चांगल्यासाठीच आहे. शासन लोकांना मारण्यासाठी औषध कधीच पाठवत नाही. कोणतीही लस घेतल्यानंतर ताप, कमजोरी, लस दिल्या जागी दुखणे, अंग दुखणे हे तर होतेच! त्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही. गावातील भूमियांचा विश्वास असल्यास कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेळ लागणार नाही.

गावपातळीवर प्राथमिक आरोग्याचे काम बघणारी व्यक्ती म्हणजे आशा सेविका. मागील १० वर्षांपासून जांबिया गावामध्ये आशा म्हणून काम बघणाऱ्या लिमी शशिकांत तोरे यांनी सांगितले, “मी आधीपासूनच कोरोना संबंधी माहिती गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन देत आली आहे. सध्या मागील २ महिन्यांपासून कोविड-१९ लसीकरणाविषयी गावामध्ये जागृती करणे सुरु आहे. माझ्या गावातील सर्व लोकांचा मला खूप आधार आहे. गाव पातळीवर सर्व आरोग्य कार्यकर्ते मिळून काम करीत आहे. गावामध्ये सर्वांनी एकानुमताने लसीकरण घेण्याचे ठरवले असून त्यानुसार लसीकरण देखील सुरु आहे. लस घेतल्यानंतरही शारीरिक अंतर ठेवणे, हाथ धुणे आणि मास्क घालण्याचे महत्व सांगणे सुरु आहे.”

मूळ जांबिया ग्राम निवासी आणि सध्या गोंडपिपरी (चंद्रपूर) येथील माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. सुरेंद्र हिचामी यांना गावामध्ये होत असलेल्या लसीकरणा संबंधी विचारले असता म्हणाले की, “कोविड-१९ लसीकरण वाढविण्यासाठी सर्वप्रथम गावातील प्रतिष्ठित व्यक्ती जसे भूमिया, पुजारी, गाव पाटील, काही शिकलेली व संवेदनशील मुलं-मुली यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्यांना कोविड-१९ लसी चे महत्व समजावून सांगणे, लस घेतल्यानंतर येणाऱ्या काही साधारण लक्षणांविषयी स्पष्टपणे माहिती देणे गरजेचे आहे. सध्या कोरोना महामारीमुळे पसरलेल्या गैसमजुतीमुळे भीतीचे वातावरण आहे त्यामुळे गावातील कुणालाही लस घेण्याविषयी बळजबरी करू नये. लोकांची बाजू प्रामाणिकपणे समजून घेऊन या सर्व बाबी गावातील आरोग्य विभागातील लोकांनी केल्यामुळे जांबिया मध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे.”

खरे पाहता गावातील लोकं कोरोनाच्या तपासणी साठी खूप घाबरतात. कारण कुणी पॉसिटीव्ह आलं तर १४ दिवस तालुका किंवा जिल्हा पातळीवर विलगीकरण केल्या जाते. आणि जिल्हापातळीवर होणाऱ्या विलगीकरणाविषयी लोकांमध्ये खूप गैरसमज आहे. याउलट जर गावामध्येच विलगीकरणाची सोय करण्यात आली तर सर्वांच्या दृष्टीने सोयीस्कर होईल. लोकं गावाच्या दूर विलगीकरणासाठी खूप भीत आहे. शिवाय सध्या सुरु असलेल्या तेंदूपत्ता तोडणी आटोपल्यानंतर लोकांकडे पैसे येतील आणि लग्न समारंभ सुरु होतील. यामध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोविड-१९ लसीकरण थोड्या जलद गतीने करणे आवश्यक आहे. असा महत्वाचा सुद्धा सल्ला सुरेंद्र हिचामी यांनी दिला.
जांबिया आणि गट्टा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या १४ गावांमध्ये आशा गटप्रवर्तक म्हणून काम बघणाऱ्या विमल बंडू पुंगाटी यांना जांबिया गावात लसीकरणासंबंधी विचारणा केली असता म्हणाल्या, “आमच्या आशांनी आपापल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन कोरोना आणि कोविड -१९ लसीकरणासंबंधी माहिती दिली. शिवाय गावात गोटुल बसवून तिथे सुद्धा लसीकरणाविषयी सकारात्मक माहिती माडिया भाषेमध्ये दिली. महत्वाची बाब म्हणजे जांबिया गावातील गाव पाटील आणि भूमिया यांनी स्वतः लसीकरण केले. त्यांना लसीकरण पश्चात कुठलेही दुष्परिणाम दिसले नाही. यामुळे इत्तर लोकही लसीकरण घेण्यासाठी प्रोत्साहित झाली. सुरुवातीला काही लोकं पुढे आली व नंतर त्यांचं बघून इतरही लोकांनी लसीकरण करणे सुरु केले.” “भूमिया, पुजारी, गाव पाटील, कोतवाल या प्रतिष्ठित व्यक्तींनी कोविड लसीकरण केल्यामुळे गावातील इत्तर लोकंही लसीकरणासाठी तयार झाली”, असे जुळते मत गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचे, आरोग्य सहाय्यक श्री. विजय मूलकलवार यांनी सुद्धा दिले.

जांबिया गावातील पुजारी श्री. बाबुराव विस्तारी यांनी १६ एप्रिल २०२१ रोजी कोविड-१९ लसीकरणाचा पहिला डोज घेतला. लस घेतल्यानंतर कमजोरी सोडली तर त्यांना इतर कुठलीही लक्षणे आढळली नाहीत. मात्र लस घेतल्याच्या पाचव्या दिवसानंतर ताप, सर्दी, खोकला, कमजोरी ही लक्षणे दिसू लागली. लस घेतल्यामुळे कोरोना होतो असा गैरसमज असल्यामुळे सुरुवातीला हे लसीकरणामुळेच झाले आणि आपल्याला कोरोना झाला अशी भीती त्यांना वाटू लागली. परंतु लगेच योग्य औषधोपचार केल्यामुळे त्यांना बरे वाटले. गावातील अनेक लोकांनी लसीकरण केल्यामुळे कुठलाही मोठा त्रास त्यांना झाला नाही आणि जी किरकोळ लक्षणे दिसली ती दुसऱ्या दिवशीपर्यंतच दिसली हे लक्षात आल्यावर त्यांनाही विश्वास बसला. आता बाबुराव विस्तारी हे लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी पूर्णतः तयार आहेत आणि इतरांनाही त्यासंबंधी ए.एन.एम चा सल्ला घेण्याचे सांगत आहे.

गावातील पुजारींकडे कोविड-१९ या आजाराचा इलाज आहे या गैसमजूतीविषयी विचारले असता विस्तारी म्हणाले की, “गावातील कुठल्याही पुजाऱ्यांकडे या रोगाचा इलाज नाही त्यामुळे मी स्पष्टपणे गावातील लोकांना सिस्टरांचा (ए.एन.एम) सल्ला घेण्यास प्रोत्साहित करतो.”

मागील ८ वर्षांपासून जांबिया उपकेंद्रामध्ये ए.एन.एम म्हणून कार्यरत असणाऱ्या सुरेखा महालदार सांगतात, “आम्ही लस येण्याच्या अगोदरपासूनच त्याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचे काम जोमाने सुरु केले. खाजगी दवाखान्यांमध्ये महाग दरामध्ये देण्यात येणारी ही कोविड-१९ ची लस शासनाने आपल्याला मोफत उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते ही आपल्या गावा नजीक. त्यामुळे लस उपलब्ध होताच सर्वांनी घ्यावे कारण लवकरच लसीचा तुटवडा होईल अशी विनवणी मी आशा, अंगणवाडी सेविका, एम.पी.डब्लू यांच्या मदतीने गावकऱ्यांना केली. आणि हे करत असतांना आम्ही कुणावरही बळजबरी केली नाही. पुजारी, भूमिया, गाव पाटील, कोतवाल, दाई यांच्याशी लसीकरणासंबंधी सखोल चर्चा करून त्यांना लसीचे महत्व पटवून सांगितले.”

कोरोना चाचणी केली की रिपोर्ट नेहमी पॉसिटीव्हच येतो आणि नंतर दवाखान्यात भरती करतात व तेथे मृत्यू होतो असेच लोकं मानत होते. हा गैरसमज दूर करण्यासाठी व लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी मी स्वतःवरच काहीवेळा कोरोना ची चाचणी सर्वांसमोर करून दाखवली. जेव्हा माझा रिपोर्ट नेगेटिव्ह आला तेव्हा लोकांचा विश्वास बसला. जांबिया गावातील लोकं खूप समजदार आहेत व त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. सिस्टर जे करत आहे ते आमच्या भल्यासाठीच करतात असे लोकं मानतात. लसीबद्दल असलेल्या गैरसमजुती चे सुद्धा वारंवार भेटून निराकरण केले. त्यामुळे येथे बऱ्याच लोकांनी लसीकरण केले. कुण्या एकट्याच्या नाही तर आशा, अंगणवाडी सेविका, आशा गटप्रवर्तक, एम.पी.डब्लू तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर सर्वांच्या मदतीने गावामध्ये बदल घडून आला आहे.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये १८ वर्ष वयोगटावरील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे आणि यासाठी जांबिया गावातील युवा मंडळी तयार आहेत. जांबिया गावातील ३२ वर्षीय मुकेश डोलू हिचामी सोबत लस घेण्याबद्दल विचारणा केली असता तो म्हणाला, “कोरोनाची लस घेण्यासाठी मला कुठलीही भीती नाही. शासनाने कोविड-१९ ची लस ही आजारापासून बचाव करण्यासाठीच तयार केली आहे. कोविड-१९ लसबद्दल असणाऱ्या अफवांमुळे माझं लस घेण्यासंबंधी मत बदलणार नाही. अफवांना बळी न पडता आमच्या ग्राम पंचायतीने एकानुमताने लस घेण्याचे ठरवले आहे याचा मला खूप अभिमान आहे.”

“आमच्या ए.एन.एम, आशा, अंगणवाडी सेविका, आशा गटप्रवर्तक, एम.पी.डब्लू खूप तळमळीने काम करीत आहे. कोविड-१९ आजाराबद्दल आणि लसीकरणासंबंधी गावातील लोकांना येणारे प्रश्न नीट समजून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे उत्तम काम सर्वजण मिळून करीत आहे. शिवाय गावातील लोकांनी आरोग्य यंत्रणेवर दाखविलेला विश्वास खूप प्रशंसनीय आहे.” असे प्राथमिक आरोग्य केंद्र, कसनसूर येथे वैद्यकीय अधिकारी आणि एटापल्ली तालुक्याचे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अस्मिता देवगडे यांनी गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या जांबिया उपकेंद्रातील सर्व आरोग्य कार्यकर्त्यांचे कौतुक करत सांगितले.

भूमिया, पुजारी, गाव पाटील, कोतवाल, शिक्षक, दाई यांसारख्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबतच सर्वसामान्य जनतेने देखील लसीकरण करणे ही एक खूप महत्वाची व कौतुकास्पद बाब आहे. आशा, अंगणवाडी सेविका, ए.एन.एम, आशा गटप्रवर्तक सोबत गट्टा आरोग्य केंद्रातील इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेहेनत तर घेतलीच आहे पण गावातील लोकांनी सुद्धा कुठल्याही गैरसमजांना बळी न पडता लसीकरण केले आहे. जांबिया उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या मूळ जांबिया गावामध्ये कोविड-१९ लसीकरण घेण्याचे प्रमाण तर वाढलेच आहे शिवाय या गावाचा आदर्श घेऊन इतर सहा गावांमध्ये सुद्धा लसीकरणाचे प्रमाण खूप वाढत आहे. कोरोना महामारीच्या काळात जांबिया गावाने एक आदर्श गाव म्हणून उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. या गावाप्रमाणेच एटापल्ली आणि गडचिरोलीतील इतरही तालुकेही निश्चितच प्रोत्साहित होतील आणि प्रतिबंधात्मक उपयोजनांसोबतच लसीकरणाचे ही प्रमाण वाढून गडचिरोली जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आशा.