ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटली की ते उत्तर भारतीय द्वेषी अशी साधारण भावना प्रसार माध्यमांनीच लोकांच्या मनात बिंबवून ठेवली आहे. मग त्यात चुकीची आणि सत्यता न बघता हिंदी प्रसार माध्यमांनी देशभर त्यांच्याबद्दल नाकाराम्तक बीज रोवली. अगदी महाराष्ट्रात रोजगार हा पहिल्यांदा मराठी मुलांनाच असा आग्रह धरला तरी राज ठाकरेंची गुंडगिरी असे मथळे प्रसार माध्यमांमध्ये सहज पाहायला मिळाले. त्यात हिंदी मीडिया नेहमीच अग्रेसर राहिला, परंतु देशातील इतर राज्यात असे विषय उचलले गेले की कोणतीही वाच्यता हिंदी माध्यमं प्रसारित करत नाहीत, हे वास्तव आहे.
मनसेचा जोर हा इथल्या मराठी युवकांच्या हक्काच्या रोजगारापुरता मर्यादित नव्हता, तर इथल्या पायाभूत सुविधांवर देखील किती ताण पडतो हे राज ठाकरे यांनी अनेकदा त्यांच्या भाषणातून व्यक्त केलं आहे. परंतु, त्यामागील वास्तव समजून घेण्यापेक्षा हिंदी आणि मराठी प्रसार माध्यमांनी देखील नंतर त्याच्याविरुद्दच सूर लावून धरला. परिणामी सगळ्याच पक्षांना आणखी बळ चढलं आणि राज्यात मराठी पेक्षा अमराठीच अधिक महत्वाची ठरू लागली. त्याचाच प्रत्यय काही दिवसांपूर्वी आलेल्या संशोधनात राज्यात भविष्यात मराठीचं अस्तित्वच संपुष्टात येण्याची आकडेवारी सांगत आहे.
राज ठाकरे उत्तर भारतीय पंचायतमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जाणार असे वृत्त येताच प्रसार माध्यमांनी प्रत्यक्ष दिवसाची वाट न पाहता अतिउतावळेपणा करत ‘हमार नेता कैसन हो, राज भैया जैसन हो’ अशा मथळ्यांनी चर्चा सत्रच भरवली, हे पाहायला मिळाले आणि थेट त्याचा संबंध देखील उत्तर भारतीय मतपेटीशी जोडण्यास सुरुवात केली. परंतु, प्रत्यक्ष उत्तर भारतीय पंचायतमध्ये राज यांनी याच पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताण अधोरेखित केला.