मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती आणि त्यानंतर माध्यमांमध्ये या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. त्यात राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, तत्पूर्वी एक घटना दिल्लीत घडली होती आणि ती म्हणजे स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती.
आज जरी राफेल खरेदी व्यवहार देशभर गाजत असला तरी, तो प्रकाश झोतात येण्यापूर्वी राहुल गांधींनी लोकसभेत तो अनेक वेळा उचलून धरला होता. परंतु, माध्यमांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर दुर्लक्ष करत काहीच झालं नसल्याचं दाखवलं होतं. त्यामुळे राहुल गांधी देखील हैराण होते, त्यावेळी आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतः राहुल गांधी यांनी गुढीपाडव्याच्या सभेपूर्वी दिल्लीत शरद पवारांची भेट घेऊन राफेल कराराचा विषय राज ठाकरे यांनी गिढीपाडव्याच्या सभेत उचलावा अशी विनंती करणारा संदेश, त्यावेळी शरद पवारांमार्फत राज ठाकरे यांना कळवळा होता.
दरम्यान, त्याच गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी लोकांना अनपेक्षित पणे भाषणादरम्यान धक्का दिला आणि राफेलचा विषय अगदी अनिल अंबानींचं नाव घेत उचलला आणि प्रसार माध्यमांचं लक्ष त्यावर केंद्रित केलं. त्यानंतरच राफेलचा विषय राजकीय पटलावर जोरदारपणे उचलला गेला आणि त्यानंतर पुढचं काम राहुल गांधी आणि काँग्रेस पुरेपूर तडीस घेऊन गेले. तिथेच राज ठाकरे आणि राहुल गांधी यांची अप्रत्यक्षरीत्या राजकीय जवळीक वाढली. तर शरद पवार हे केवळ प्रसार माध्यमांच्या तर्कवितर्कांना कारण ठरले. उत्तर भारतीयांसोबतची मनसेची भूमिका जगजाहीर असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्यासोबत आघाडी करणार नाही किंवा आघाडीत सामील करून घेणार नाही हे न समजण्या इतके राज ठाकरे उधखुळे नाहीत. त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे नेतेमंडळी एकाबाजूला मागील काही दिवसांपासून वेगवेगळी विधानं करत बसले, परंतु राज ठाकरे यांनी यावर काहीही भाष्य न करता मागील काही महिन्यांपासून राज्यभर दौरे सुरु ठेवले. संबंधित दौऱ्यांमध्ये त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच मैत्रीपूर्ण आशा पल्लवित झाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशा तीनही पक्षांची एकसुद्धा एकत्रित बैठक झाली नसताना, शरद पवारांच्या एका मुलाखतीनंतर प्रसार माध्यमांनी रंगवायला घेतलेलं तर्क चित्र अजूनही रंगवून झालेलं नाही.
- दुसरीकडे राज ठाकरे या सर्व तर्कांकडे कानाडोळा करत मनसे पदाधिकाऱ्यांचे मेळावे, पक्षबांधणी, मोर्चे आणि बैठकांवर बैठका घेण्यात व्यस्त होते. आज पुन्हा ते दौऱ्यावर निघाले आहेत. वास्तविक काही लोकसभा मतदारसंघात त्यांनी कामाला लागण्याचे आदेश महिन्याभरापूर्वीच दिल्याचे वृत्त आहे. विषय हा येतो की ते नेमक्या कोणत्या आणि किती जागा लढवणार त्याचाच. आज युती झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर मतदार हा भाजप आणि शिवसेनेवर नाराज आहे. त्यात शिवसेनेबद्दल सामान्य मराठी माणसाच्या मनात निर्माण झालेली चीड सहज नजरेस पडते. त्यामुळे अशी संधी राज ठाकरे घालवतील असं समजणं मूर्खपणाचं ठरेल. परंतु, ते जेव्हा कधी स्वतः निर्णय जाहीर करतील, तेव्हा सर्व अभ्यासानिशी करतील, कारण पूर्वानुभवातून त्यांच्या विरुद्ध शिवसेना पुन्हा कोणता रडीचा डाव सुरु करणार याची त्यांना चांगलीच कल्पना आहे. केवळ राजकीय भेटींनंतर युती-आघाडी असं काही प्रत्यक्ष घडायला सुरुवात झाली असती तर ममता बॅनर्जींच्या आणि चंद्राबाबूंच्या भेटीनंतर शिवसेना देखील तिसऱ्या आघाडीत सामील होणार असे तर्क काढावे लागले असते.