पारधी समाजातील बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाची मागणी

60

वर्धा:- इंझाळा येथील पारधी समाजातील सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघ,वर्धा जिल्ह्याच्या वतीने मा.ग्रुहमंत्री अनिल देशमुख यांना मा. जिल्ह्याधिका-यांमार्फत निवेदनातून करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यातील इंझाळा, त.देवळी,जि.वर्धा या गावाच्या लगत असलेल्या पारधी बेड्यावरील सात वर्षीय बालिकेला झोपेतच तिच्या आईच्या खाटेवरुन उचलून नेत गावाजवळच असलेल्या नर्सरीमध्ये तीन समाजकंटकांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केला.ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.गांधी जिल्ह्याची मान शरमेने खाली झुकली असून कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत.
तक्रारीच्या आधारे पोलीसांनी एका आरोपीस अटक केली आहे.त्याचेवर विविध कलमांची नोद केली असली तरी तपास संथगतीने सुरू असल्यामुळे तपासात त्रुट्या आढळून येत आहेत. अद्यापही दोन आरोपी फरार आहेत.पोलिसांच्या चौकशी अहवालानुसार भविष्यात आरोपींंस कायद्यातून सोयीस्कर सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी आपण ही बाब गंभीरतेने घेऊन सदर खटला जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग करण्यात यावा व आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघ,वर्धा जिल्ह्याच्या वतीने निवेदनातून करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभय कुंभारे(दैनिक जनतेनचा महानायकचे जिल्हा- प्रतिनिधी) ,ज्येष्ठ पत्रकार प्रदीप भगत, महाबोधी चँनलचे विदर्भ प्रमुख अचिन पवार,आँल जर्नलिस्ट एमबीसी वर्धाचे तालुका अध्यक्ष अश्विन बोंदाडे,महेंद्र पाटील, रमेश निमसडकर,स्वप्निल कांबळे, गौतम देशभ्रतार, सुनिल बाभळे,श्यामराव डाहाके,दादाराव शेलकर, गोविंद राऊत, प्रदीप अन्नाजी भगत, मनोज मानवटकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.