प्रकरणे प्रलंबित ठेवू नका गावपातळीवरचे रस्त्यांचे वाद तत्काळ निकाली काढा: पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
अमरावती :- गावपातळीवर रस्त्यांच्या हक्कांवरून वाद निर्माण होतात. ही प्रकरणे महसूल विभागाकडून तालुका पातळीवर हाताळली जातात. अशा प्रकरणांबाबत सर्व बाजू तपासून प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.
कोरोना संकटामुळे व संचारबंदीमुळे रस्त्याचे वाद निकाली काढण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. मात्र, आता बाधितांची संख्या घटल्यामुळे संचारबंदीत शिथिलता आली आहे. त्यामुळे रस्त्याच्या वादाची प्रलंबित प्रकरणे वेळीच निकाली काढावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
गावपातळीवर शेतीतील रस्त्यांबाबत अनेकदा वाद निर्माण होतात. तेव्हा दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन, कायद्यातील तरतुदी व सर्व बाजूंचा विचार करून सामंजस्याने मार्ग काढला पाहिजे व वादांचे तत्काळ निराकरण केले पाहिजे. असे वाद प्रलंबित राहता कामा नये. वेळीच आवश्यक सुनावण्या, तपासण्या आदी प्रक्रिया पूर्ण करावी. सामोपचाराने मार्ग काढून त्याचे निराकरण करावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
कोविड संकटामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत अशा प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठी असू शकते. प्रलंबित राहिल्याने प्रश्न तसाच राहतो. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार आदींनी मिशनमोडवर काम करून सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.