वर्धा जिल्हात मोफत शिक्षण अधिकार कायद्याअंतर्गत RTE चे प्रवेश 11 जूनपासून सुरु होणार.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
वर्धा,दि.10 जुन :- मोफत शिक्षण अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मिडिया वार्ता न्युज ला मिळाली आहे. वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश 20 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मोफत शिक्षण अधिकार कायद्याअंतर्गत आरटीई प्रवेशांसाठीची लॉटरी पध्दतीने सोडत 7 एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वर्धा जिल्हासह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यातूनच कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेशासाठी प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनी, ईमेल, व्हॉट्सअॅाप द्वारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घ्यावा लागणार आहे. बरेच पालक प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश अर्जात घर ते शाळेचे अंतर चुकीचे भरतात. त्यामुळे पालकांनी सादर केलेल्या रहिवासी पत्त्याच्या पुराव्यावरून शाळेकडून अंतराची पडताळणी करण्यात येईल. चुकीचे अंतर नमूद केल्याचे निदर्शनास आल्यास शाळेकडून तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल.
पालकांच्या कागदपत्रांची तपासणी पडताळणी समितीमार्फत करण्यात येणार आहे. पडताळणी समितीने आलेले अर्ज, तक्रारींची शहानिशा करून प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश सुरू होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळेला द्यायचा आहे. शाळांनी पालकांना प्रवेशासाठी तारखा द्याव्यात आणि आरटीई प्रवेश सुरू झाल्याची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावी लागणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी संपल्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतच्या सूचना आरटीई संकेतस्थळावर दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.