मुंबईच्या दहिसरमध्ये पावसामुळे तीन घरं कोसळली, एकाचा दुर्दवी मृत्यू.

✒️नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒️
मुंबई:- मुंबई इमारती कोसळण्याची एक शृंखल सुरु असल्याचे समोर येत आहे. बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे मालाड मध्ये तीन मजली घर कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता गुरूवारी अशीच दुर्घटना दहिसर मध्ये घडली. दहिसरमधील शिवाजी नगर येथे तीन घरं अगदी पत्त्यासारखी कोसळली आहेत. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रद्युम्न सरोज वय 26 वर्ष असं मृताचं नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे दहिसर येथील शिवाजी नगरमधील लोखंडी चाळ येथे घराखालची माती सरकल्यामुळे तीन घरे कोसळली आहेत. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे. अग्निशमन दलाने सात ते आठ जणांना बाहेर काढले. या दुर्घटनेत प्रद्युमन सरोज या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक तरुण जखमी झाला आहे.