यवतमाळ जिल्हा प्रवाहित विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याच्या मृत्यू; एक गंभीर जखमी.
महावितरणचे अधिकारी जबाबदार आहेत. दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार राजेंद्र नजरधने

✒साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
महागाव/यवतमाळ:- यवतमाळ जिल्हातील महागाव तालुक्यातून एक दुखद बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे हयहय व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या शेतातील झाडावरील फांद्या तोडण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या प्रवाहित विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला ही घटना महागाव तालुक्यातील कलगाव शिवारात मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. तर एक मजूर गंभीर जखमी झाला. देवानंद बाळाजी राऊत वय 40 वर्ष, रा. कलगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अजगर खा पठाण हा मजूर गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवानंद राऊत यांचे महागाव येथे तिरुपती एजन्सीचे दुकान असून, तो सध्या महागाव येथे स्थायिक आहे. आईच्या नावे दीड आणि मृताच्या नावे दीड असे तीन एकर सामायिक क्षेत्र आहे. पेरणीची तयारी असल्याने शेतात ये-जा करण्यासाठी बाभळीचे झाड अडसर ठरत होते. झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी देवानंद यांनी दोन मजूर शेतात नेले होते.
शेतात जात असताना पाण्याचा डव साचल्याने मार्ग काढत असताना पाण्यात पडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने देवानंद यांचा जागीच मृत्यू झाला. सहकारी मजुरांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला. यात एक मजूर गंभीर जखमी झाल्याने सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. मृत देवानंद राऊत यांच्या पाश्चात्य पत्नी, आई, वडील आणि दोन मुले आहेत.
विद्युत रोहित्र आणि लोंबलेल्या तारेबाबत महावितरणकडे अनेक तक्रारी आहेत. मात्र, त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. मॉन्सून पूर्व नियोजन कोलमडल्याने लोंबलेल्या तारा वादळी वाऱ्यामुळे पडल्याने हा अनर्थ घडला. याला महावितरणचे अधिकारी जबाबदार आहेत. दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी केली आहे.