अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीस आजाराने मृत्यू.

✒️अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी✒️
अहमदनगर,दि.15जुन:- महाराष्ट्र कोरोना वायरस महामारीचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं जनतेला दिलासा मिळाला आहे. मात्र, त्यात आता ब्लॅक फंगस सारख्या इतर आजारांची भर पडत आहे. कोरोना रूग्णसंख्येचा आकडा कमी झाला असला तरी त्यानंतर म्युकरमायकोसीसचा धोका वाढला आहे. अशातच एक मनाला चटका लावून जाणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात घडली आहे.
राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीला म्युकरमायकोसीसनं हिरावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिर्डीत राहणाऱ्या कोरके यांच्या परिवारातील 6 महिन्याच्या श्रद्धा कोरके या चिमुरडीला कोरोनाची लक्षणं आढळल्यानं तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान तिनं कोरोनावर मात केली. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळं परिवारातील सदस्यांनीही सुटकेचा श्वास सोडला. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. तिला म्युकरमायकोसीसची लक्षणं दिसून आली. तेव्हा कोरके परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली.
दरम्यान, व्हेंटिलेटवर असणाऱ्या श्रद्धाला लोणी येथील प्रवरा रूग्णालयात 13 तारखेला दाखल करण्यात आलं होतं. तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र, तिचा उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्युकरमायकोसीस जास्त प्रमाणात पसरल्यानं तिच्यावर शस्त्रक्रिया करणंही शक्य नव्हतं. खूप प्रयत्नांनंतरही डॉक्टरांना अपयश आलं आणि आज सकाळी तिची प्राणज्योत मालावली. तर, एवढ्या लहान मुलीला म्युकरमायकोसीस होण्याची आणि त्यात मृत्यू होण्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळं पालकांनी मुलांची काळजी घ्या असं, आवाहन डॉक्टर भालवार यांनी केलं.