गावांची_जातीवाचक_नावे_बदलून_नवीन_नावे_देण्याबाबतचे_प्रस्ताव_तातडीने_सादर_करावे.
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा 24/06/2021राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाही. राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे बदलण्याचा निर्णय राज्यशासनाने 6 मे 2021 रोजी जारी केला. अशा जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नांवे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षते खाली गठीत समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे त्या विशिष्ट समजाच्या जातीवर अन्यायकारक असून अशा गावांची यादी तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्यात.
सदर शासन निर्णयानुसार गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपध्दती शहरी भागासाठी नगर विकास विभागाने व ग्रामीण भागासाठी ग्राम विकास विभागाने निश्चित करुन जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही करावयाची आहे. शासनाचा प्रस्तुत निर्णय महत्वाकांक्षी व राज्याच्या सामाजिक सलोख्यावर सकारात्मक परिणाम करणारा असल्याने, सदर निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणे
आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.
गावांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधिक्षक, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मुख्याधिकारी नगरपरिषद/नगरपंचायत, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य आहेत.
आजच्या बैठकीत जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यातील वायगाव गोंड हे नाव बदलण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी दिली. यासोबतच सर्व गावांची, बेडा, तांडा, वस्त्या आणि रस्ते यांची माहिती पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
या बैठकीला पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे उपस्थित होते.