#किटकनाशके वापरतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
24/06/2021कोणतेही किटकनाशके हे मनुष्य प्राण्यांच्या तसेच इतर जिविताकरीता अपायकारक प्रसंगी प्राणघातक ठरु शकतात. त्यामुळे पिकांवर किटकनाशकाची फवारणी करतांना शेतक-यांनी अंत्यत काळजी घेणे आवश्यकआहे.
किटकनाशकाच्या डब्यासह घडीपत्रिकेमध्ये किटकनाशकांच्या दुष्परिणामावर करावयाच्या उपाययोजना छापलेल्या असतात त्यांचे वाचन करुन सावधानी बाळगावी. किटकनाशके हाताळतांना रबरी मोजे घालावे. द्रावण तयार करतांना काठी किंवा डाव वापरुन पाण्यात निट मिसळावे. फवारणीचे द्रावण तयार करण्यापासुन फवारणी पुर्ण होईपर्यंत डोळयावर चष्मा, हातामध्ये रबरी हातमोजे व तोंडावर मास्क अथवा उपरणे गुंडाळावे. प्रकश्तीची कुरबुर असल्यास (उदा. सर्दी पडसे, ताप) फवारणी करु नये. फवारणीचे काम बालकावर सोपवु नये. फवारणी वारा शांत असतांना व वा-याच्या दिशेने सकाळी किंवा सायंकाळी करावी. तीव्र उन्हात व हवा असतांना करु नये.
फवारणीचे द्रावण तयार करण्यापासुन फवारणी पुर्ण होईपर्यंत फवारणी करणा-या सर्व व्यक्तींनी खाणे, पिणे, तंबाखु , धुम्रपाण करु नये. कृषि विद्यापिठ तसेच उत्पादक कंपनीने शिफारस केलेल्या मात्रे प्रमाणेच किटकनाशकाचे द्रावण तयार करावे. कोणत्याही परिस्थितीत किटकनाशकाचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. फुटलेले किंवा मोडके स्प्रेपंप वापरु नये. चांगल्या प्रतीचा पंप व नोझल वापरावे फवारणी शरीरापासुन लांबवर करण्याची काळजी घ्यावी. नोझल साफ करतांना तोंडाने फुंकर मारु नये. फवारणी झाल्यानंतर साबनाने हात स्वच्छ धुवावे.
डोके दुखने, घाम येणे, मळमळ इत्यादी लक्षणे आढळून आल्या फवारणी तात्काळ थांबवावी व फवारणी न झालेल्या मोकळया जागेवर सावलीमध्ये बसावे. किटकनाशकासोबत दिलेल्या घडी पत्रिकेमध्ये दिलेली उपाययोजना करावी. त्रास होणा-या व्यक्तीस मिठाच्या पाण्याचे द्रावण पिण्यास दिल्यास उलटीवाटे विष बाहेर पडते. डोळे चुरचुरत असल्यास चुकुनही डोळयाना हात लावु नये. बशीमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यात डोळा बुडवावा व डोळयाची उघडझाप करावी. असे पाणी बदलुन दोन तिन वेळा करावे. व जवळच्या डॉक्टरकडे तात्काळ उपचार घ्यावा. डॉक्टरांना घडी पत्रिका व किटकनाशकाचा डबा दाखवावा असे कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे यांनी कळविले आहे.