*शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा*
*बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*

*बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*
✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961
अमरावती: – दर्जेदार उत्पादन निर्मितीसह विपणन कौशल्य व तांत्रिक बाबींच्या प्रशिक्षणातून शेतकरी व महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
कृषी विभाग, आत्मा व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातर्फे कृषी संजीवनी मोहिमेत शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात झाली, त्याचे उदघाटन करताना त्या बोलत होत्या. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, वि. प. स. किरण सरनाईक, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड, कृषी सहसंचालक शंकर तोटेवार,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान, महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत एक जिल्हा एक उत्पादन, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया असे अनेक योजना- उपक्रम गटांसाठी राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ शेतकरी व महिला गटांना मिळवून द्यावा. त्यासाठी योजनेची माहिती, तांत्रिक बाबी याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण, प्रचार- प्रसार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आवश्यक कार्यशाळा आदींचे आयोजन नियमित करावे. योजनेचा शेवटच्या माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. श्री. पोटे पाटील, श्री. सरनाईक आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.