सिंदेवाही शहरासाठी 27 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर -पालकमंत्री विजय वडेट्टीवार
विविध वि केकास कामांचे भुमिपूजन

विविध वि केकास कामांचे भुमिपूजन
मुकेश शेंडे
तालुका प्रतिनिधि ,सिंदेवाही
9011851745
मीडिया वार्ता न्यूज,सिंदेवाही,
चंद्रपूर,दि. 1 जुलै : सन 2022 पर्यंत सर्वांच्या घरी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सिंदेवाही शहरासाठी आसोलामेंढातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी 27 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
नगर पंचायत सिंदेवाहीच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचे भुमिपूजन आणि स्थानिक आमदार निधीमधून नगर पंचायतीकरीता प्राप्त शववाहिनी आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी नगर पंचायत अध्यक्षा अशा गंडाटे, उपाध्यक्ष स्वप्नील कावळे, महिला व बालकल्याण सभापती नंदा बोरकर, जि.प.सदस्य रमाकांत लोधे, लोनवाहीच्या सरपंच नेहा समर्थ, पं.स.सदस्य राहुल पोरेड्डीवार, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.
सुंदर सिंदेवाही करण्याचा आपला मानस असून शहराच्या विकासासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, येत्या दोन – तीन महिन्यांत सिंदेवाहीसाठी 85 लक्ष रुपयांची अग्निशमन गाडी येणार आहे. नगर पंचायत इमारतीकरीता तीन कोटी तर संरक्षण भिंतीकरीता एक कोटी मंजूर करण्यात आले आहे. शहराच्या सौंदयीकरणात भर देण्यासाठी उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंदेवाहीतील नागरिकांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहरात विविध ठिकाणी 1 कोटी 84 लक्ष रुपये खर्च करून 16 वॉटर एटीएम लावण्याचे प्रस्तावित आहे.
भविष्यात संपूर्ण शहराचा जलद गतीने विकास होण्यासाठी लोणवाही ग्रामपंचायत सिंदेवाही नगर पंचायतीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. शहर सुंदर झाले की व्यापार वाढतो, या तत्वानुसार सर्वांगीन विकासासाठी आपले प्रयत्न आहेत. याशिवाय शहर सौंदर्यीकरणअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांचे 30 ते 35 फुटांचे पुतळे उभारण्यात येतील. सिंदेवाही क्रीडा संकूलासाठी 5 कोटी 60 लक्ष रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली असून पुढील महिन्यात कामाला सुरवात होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी वातानुकुलीत अभ्यासिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. या अभ्यासिकेसाठी 4 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. पंचायत समितीच्या इमारतीकरीता 9 कोटी रुपये आणि 50 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयासाठी 12 कोटींचा निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचे भुमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून इमारतीची दुरुस्ती व वर्कशॉपच्या किरकोळ डागडूजीकरीता त्वरीत प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना प्राचार्यांना दिल्या. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, सा. बां. विभागाचे अभियंता माधव गावड, आयटीआयचे प्राचार्य प्रमोद चोरे आदी उपस्थित होते.
अशी आहेत विकासकामे : सिंदेवाही नगरपंचायत अंतर्गत प्रभागातील विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व नाली बांधकाम करण्यासाठी रुपये 1 कोटी 50 लाख 67 हजार इतका निधी खनिज विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदेवाही येथील मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याकरीता 5 कोटी 89 लक्ष इतका निधी, मौजा अंतरगाव आणि नवरगाव येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी एकूण 60 लक्ष इतका निधी, चिमूर-पेंढरी- नवरगाव- अंतरगाव- सिंदेवाही आरमोरी रस्ता रा.मा.322 मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 3 कोटी रुपयाचा निधी, नवरगाव ते मिंनघरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 30 लक्ष इतका निधी, मौजे नवरगाव येथे वाल्मिकी सभागृहाच्या बांधकामाकरीता 15 लक्ष, सिंदेवाही तालुक्यातील मौजे रत्नापूर येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्याकरीता 30 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.