*वझ्झर आश्रमातील मुलांचे कोविड लसीकरण*
*जिल्हाधिकारी यांच्याकडून आस्थेने विचारपूस*

*जिल्हाधिकारी यांच्याकडून आस्थेने विचारपूस*
✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961
अमरावती : – अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधीर, बेवारस बालगृहातील पंधरा मतिमंद मुलांचे आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन लसीकरण सेंटर येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या हस्ते वझ्झर आश्रमातील मुलांना टी शर्ट व पादत्राणांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांची आस्थेने विचारपूस केली. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण भासल्यास मला सांगावे, जिल्हा प्रशासनाव्दारे तुम्हाला आवश्यक मदत पुरवली जाईल, असे आश्वासन श्री. नवाल यांनी यावेळी दिले.
वझ्झर येथील आश्रमात 123 मुले आहेत. त्यातील बहुतेकांचे लसीकरण यापूर्वीच झाले. 15 मुलांना मिरगीचा आजार असल्याने तज्ज्ञांच्या निगराणीतच लसीकरण करणे आवश्यक होते. त्यामुळे आज अमरावतीत येऊन इर्विनच्या सेंटरमध्ये लसीकरण करण्यात आले. या सर्व मुलांना लसीकरणानंतर सहा तास निगराणीत ठेवण्यात आले. सर्वांची प्रकृती चांगली आहे. जिल्हाधिकारी श्री. नवाल व सीएस डॉ. निकम यांनी आस्थापूर्वक सहकार्य केले. मुलांना भोजनासह कपडे, पादत्राणे देण्यात आली, असे आश्रमाचे शंकरबाबा पापळकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह लसीकरण केंद्राचे व एनसीडी सेंटरचे अधिकारी डॉ. प्रीती मोरे, डॉ. तृप्ती जवादे, डॉ. रामदास देवघरे, डॉ. मंगेश गुजर, मानसोपचार तज्ज्ञ प्रमोद भापके, परिचारिका सुषमा मोहिते, कविता देशमुख, पल्लवी पेठे, आहारतज्ज्ञ स्वाती गोफणे, साधना गिरी आदी उपस्थित होते.