राईस मॅन ऑफ इंडिया – दादाजी खोब्रागडे

91
Agro scientist dadaji khobragade
Rice Man of India: Dadaji Khobragade

भाताच्या ९ वाणांचे शोध लावणारे महान कृषी संशोधक- दादाजी खोब्रागडे


मनोज कांबळे, मुंबई: भाताशिवाय आपल्या भारतीयांचा आहार पूर्ण होऊच शकत नाही. पण आपल्या आहारातील तांदळाच्या एचएमटी सारख्या ९ प्रसिद्ध वाणांचा शोध लावणाऱ्या संशोधकाचा नाव तुम्हाला माहित आहे का? त्यांना एकदा महाराष्ट्र सरकारने सोनेरी पदकाच्या नावाने चक्क नकली पितळेच पदक पुरस्कार म्हणून प्रदान केलं होत.

त्यांचं नाव होत दादाजी रामजी खोब्रागडे. केवळ तिसरीपर्यंत शिक्षण झालेल्या दादाजींना त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड गावातील लोक “डोकेवाले ” म्हणायचे. तांदळाच्या वाणांच्या साध्या निरीक्षणानेच त्यापासून किती उत्पन्न मिळेल याची माहिती सांगण्याइतक  ज्ञान त्यांच्याकडे होत. हे ज्ञान त्यांनी आपल्या १.५ एकरच्या छोट्या शेतामध्ये वर्षांनुवर्षे प्रयोग करून मिळवले होते. ह्या साऱ्याची सुरुवात १९८३ मध्ये झाली होती. एक दिवशी ‘पटेल 3’ या धानाची लागवड केलेल्या शेतात त्यांना एक पिवळ्या रंगाची वेगळी तांदळाची लोंबी दिसली. दादाजींनी त्या लोंबीच्या वाढीसासाठी खास काळजी घेतली आणि त्यापासून एक शेर धान मिळवलं. त्याची पुन्हा लागवड केली आणि त्यापासून एक पायली धान मिळवलं. वर्षांनुवर्षे ह्या वाणांपासूनच उत्पादन वाढतच राहील. दादाजींनी हे वाणाचे नमुने गावातील शेतकऱ्यांना वाटून टाकले. या नवीन वाणापासून तयार होणार तांदूळ जास्त उत्पादन देणारा, सौम्य सुगंधित, बारीक आकाराचा आणि लोकप्रिय कोलमच्या चवीशी मिळताजुळता होता. स्थानिक बाजार पेठेमध्ये हा वाण इतका लोकप्रिय झाला कि लोक दुप्पट किमतीने तो खरेदी करायला लागले. कृषी उत्पन्न बाजार समितील व्यापाऱ्याने दादाजींच्या या नव्या वाणाला ‘एच.एम.टी.” घड्याळच नाव दिल.

१९९४ साली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधकांनी दादाजींकडून त्यांच्या एचएमटी वाणाचे नूमुने संशोधनासाठी मागवले आणि त्यांचं धान बाजारपेठेत सर्वत्र पोहचवण्याचं आश्वासन दिल. परंतु १९९८ मध्ये विद्यापीठाने दादाजी खोब्रागडेना डावलून आपल्या स्वतःच्या नावाने पीकेव्ही- एचएमटीह्या नवीन नावाखाली ते वाण बाजारपेठेत आणलं. लोक त्यांच्या शेतातून भोपळे चोरायचे. एकदा तर त्यांची शेतातील खाट कोणीतरी चोरली होती, पण त्याबद्दल दादाजीना काही वाटत नसे. पण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासारख्या मान्यताप्राप्त संस्थेने केलेल्या फसवणुकीचा त्यांना धक्का बसला होता. बाबाजींनी शेतीमध्ये एवढं मोठं योगदान दिलं होत, पण त्यांना नेहमीच सापत्न वागणूक मिळाली. पुढे २०१२ मध्ये पीपीव्हीएफआरअने दादाजींना एचएमटी वाणांच्या संशोधनाचं प्रमाणपत्र दिल, मात्र ते मूळच्या लोकप्रिय झालेल्या ” एचएमटी” नावावर न देता “दादाजी एचएमटी” या नवीन नावावर दिल. त्यामुळे धनाढ्य व्यापाऱ्यांनी दादाजीचं एचएमटी उत्पादन घेऊन हजारो करोड रुपये कमवले, पण दादाजींना त्याची रॉयल्टी न मिळाल्याने काहीच फायदा झाला नाही.

Rice man of India – Dadaji Khobragade

नकली पदक देऊन दादाजी खोब्रागडे यांची फसवणूक?

पण हाडाचे शेतकरी आणि कृषी संशोधक असलेल्या दादाजींनी त्यांचे प्रयोग सुरूच ठेवले. पुढे नांदेड हीरा (1994), विजय नांदेड (1996), दीपक रत्न (1997), डीआरके (1998) (दादाजी रामजी खोब्रागडे), काटे एच.एम.टी. (2002), डीआरके सुगंधी (2003), नांदेड चेन्नूर आणि नांदेड 92 हे वाण दादाजींनी शोधून काढले. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना २००५ साली नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’चा पुरस्कार मिळाला. २०१० साली ‘फोर्ब्स’ या आंतरराष्टीय मासिकाने त्यांना ” सर्वोत्कृष्ट ग्रामीण उद्योजक ” या पुरस्काराने गौरवलं. 2004 साली महाराष्ट्र सरकारने दादाजीना कृषी भूषण आणि कृषीरत्न या पुरस्काराने सन्मानित केलं. 25,000 हजार रुपये रोख, 50 ग्रामच सोनेरी पदक आणि प्रमानपत्र स्वरूपात हा पुरस्कार करण्यात आला. आयुष्यभरात दादाजीना शंभराहून जास्त पुरस्कार मिळाले होते. मला आनंद आहे, पण कोणतीही आर्थिक साहाय्य मिळत नसल्याने माझ्यासारख्या शेतकऱ्याने या पुरस्कारांचे काय करावं, असा प्रश्न त्यांना पडायचा. एकदा आर्थिक टंचाईमुळे शासनाकडून मिळालेलं सोनेरी पदक गहाण ठेवण्यासाठी ते सरफाकडे गेले होते, तपासाअंती कळलं की ते ते सोनेरी पदक चक्क नकली होत.कृषीप्रधान म्हणून मिरवणाऱ्या भारत देशातील प्रशासनाने दादाजी खोब्रागडे सारख्या महान कृषी संशोधकाची नकली पितळेच पदक देऊन फसवणूक केली होती.

Rice man of India – Dadaji Khobragade

दादाजी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला खूप मानत असतं. आपले शेतीविषयक ज्ञान ते मन मोकळेपणाने समाजबांधव, आसपासचे शेतकरी यांच्याशी वाटत असत. आंबेडकरांनी सांगितलेली समता, बंधूतेची तत्वे त्यांनी आपल्या अंगी बाणवली होती. वृद्धापकाळातही ते न चुकता शेतात जायचे. आजारपणामुळे 3 जुलै 2018 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मित्रजित आता शेती संशोधनाचं काम करत त्यांचा वारसा पुढे चालवत आहे.