मुंबईतल्या तिघाची, रायगड जिल्ह्यातील पाली भूतवली धरणात बुडून जलसमाधी.

✒नीलम खरात✒
मुंबई नगर प्रतिनिधी
9136879930
मुंबई:- रायगड जिल्हातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पावसाळात पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यातील पाली भूतवली धरणावर मुंबईतुन आलेल्या तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.9 ला शुक्रवारी घडली आहे. ही तीन मुले मुंबईतील कुर्ला भागात राहणारी आहेत. साहील त्रिभुके, प्रीतम साहू आणि मोहन साहू अशी या तिघांची नावे आहेत.
रायगड जिल्हातील प्रसिद्ध पाली भूतवली धरण कर्जतजवळ असून, या धरणावर हे तिघे पोहायला गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पोहता येत नसल्याने हे तिघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. ही तिन्ही मुले अल्पवयीन असून साहील हिरालाल त्रिभुके याचे वय 15 वर्षे, प्रीतम गौतम साहू याचे वय 12 वर्षे आणि मोहन साहू याचे वय 16 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे तिघे कुर्ल्यातील नौपाडा येथील नानीबाई चाळीत राहत होते.
कर्जत आणि खालापूर या रायगड जिल्ह्यातील तालुक्यातल्या धबधब्यांचे पर्यटकांमध्ये विशेष आकर्षण आहे. पर्यटक पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. मात्र, कर्जत आणि खालापूर तालुक्यातील धबधब्यांवर आणि धरणांवर पावसाळ्यात फिरण्यास बंदी घालणारे आदेश कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी काढले आहेत. येथे जाण्यास बंदी असतानाही ही मुले येथे पोहण्यासाठी गेली आणि आपले जीव गमावून बसली. या तीन मुलांच्या जाण्याने कुर्ला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.