इंग्लंडमधील भारतीय क्रिकेट संघ कोविडच्या घेऱ्यात, रिषभ पंतसह एकूण चार जणांना कोरोनाची लागण

62

दोन खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

४ ऑगस्ट पासून होणारी भारत-इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका लांबणीवर जाण्याची शक्यता
४ ऑगस्ट पासून होणारी भारत-इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका लांबणीवर जाण्याची शक्यता.

मनोज कांबळे
मुंबई, दि.१५ जुलै २०२१: पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड मध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय संघातील चार जणांना कोरोनची लागण झाली आहे. सर्वात प्रथम यष्टीरक्षक ऋषभ पंत यास कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर संपर्कात आलेल्या संघातील इतर व्यक्तींची तपासणी केली असता राखीव यष्टिरक्षक रिद्धिमान सहा, गोलंदाजी कोच भारत अरुण, थ्रोडाऊन एक्स्पर्ट दया गिरानी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. त्यांच्यामध्ये ताप,थंडीसारखी सौम्य लक्षणं दिसून आली होती. सध्या सारे पॉझिटीव्ह रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखेखाली क्वारंटाईन असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यानंतर भारतीय कसोटी संघाला २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. या सुट्टीमध्ये संघातील सिनिअर खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आपल्या कुटुंबासह इंग्लंड मध्ये फिरत होते. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी गेले होते. ऋषभ पंत आणि इतर काही खेळाडू फुटबॉल युरो कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी विंम्ब्ले स्टेडियममध्ये हजर होते.

इंग्लंड मध्ये सध्या दररोज सरासरी ३५००० कोरोना रुग्ण आढळत आहेत. तसेच देशातील जनतेला बिना – मास्क बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली असून इंग्लंडमधील सोशल डिस्टसिंगचे नियम ही शिथिल करण्यात आले होते. याची पूर्वकल्पना असूनही खेळाडूंना इंग्लंडमध्ये खुल्यावर फिरण्याची परवानगी देण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर अनेक जणांनी याअगोदरच प्रश्नचिन्हं उभ केल होत.

४ ऑगस्ट पासून भारत इंग्लंड मधील पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. संक्रमित भारतीय खेळाडूंच्या तब्येतीमध्ये वेगाने सुधारणा होत असली तरी रिकव्हरी झाल्यानंतर ते खेळाडू पाच कसोटी सामन्यांची दीर्घ मालिका खेळण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असतील का? आणि नसल्यास त्यांच्या जागी कोणत्या खेळाडूंना भारतातून इंग्लंडला पाठवावं लागेल? या सारख्या समस्यांना बीसीसीआय सामोर जावं लागणार आहे. या कारणाने कदाचित कसोटी मालिका लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आधीच भारत आणि श्रीलंका मधील यामधील श्रीलंकेमध्ये खेळली जाणारी एकदिवसीय आणि टी- ट्वेंटी मालिका श्रीलंकेचे खेळाडू कोरोना बाधित झाल्याने १३ जुलै ऐवजीं १८ जुलैला पुढे ढकलण्यात आली आहे.