*गोळीबारचा, आवाजाने नागपूर हादरले​*

कार बाजूला करण्यास सांगितले म्हणून तरुणांच्या टोळक्याने गोळीबार केला. नागपुरातील जरीपटका परिसरात ही घटना घडली. यात एक तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर: क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा युवकांनी केलेल्या गोळीबारात युवक जखमी झाला. ही थरारक घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जरीपटक्यातील हुडको कॉलनी येथे घडली. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. प्रितेश पाटील (वय २५), असे जखमीचे नाव आहे.
प्रितेशचा भाऊ पलाश राजू पाटील (वय २७) याने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसानी पुनेश ठाकरे, मनोज कहाळकर व त्याच्या आठ साथीदारांविरुद्ध बेकायदा जमाव जमवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी रात्री पलाश हा कारने घरी जात होता. वैशालीनगर शाळेसमोर आठ ते दहा युवक रस्त्यावर गाडी पार्क करून बोलत होते. पलाश याने त्यांना गाडी बाजूला करायला सांगितले. त्यांनी पलाश याला शिवीगाळ केली. पलाशने नमते घेतले. तो घरी गेला. त्यानंतर काही वेळातच पुनेश, मनोज व त्याचे साथीदार हातात तलवार व शस्त्रे घेऊन पलाश याच्या घरी गेले. त्यांनी पलाश याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. पलाश याचा भाऊ प्रितेश हा बाहेर निघाला. यावेळी हल्लेखोरांच्या एका साथीदाराने प्रितेश याच्या दिशेने गोळीबोर केला. गोळी प्रितेश याच्या पोटाला चाटून भिंतीवर आदळली. प्रितेश जखमी झाला. कार व मोपेडची तोडफोड करून हल्लेखोर पसार झाले.
दरम्यान, गोळीबाराच्या आवाजाने नागरिक जमले. एका नागरिकाने जरीपटका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच जरीपटका पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पलाशच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here