सॉफ्टवेअर बनवून देण्याच्या नावावर भाजपा आमदाराच्या मुलाची 40 लाखांने केली फसवणूक.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930
कल्याण/मुंबई,दि.16 जुलै:- मुंबईच्या उपनगर कल्याण मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने कल्याण पूर्व क्षेत्राचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची फसवणूक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. फसवणुक झालेल्या आमदारांच्या मुलाचे नाव प्रणव गायकवाड असं आहे. त्याची स्वत:ची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. प्रणवची कंपनी शिक्षणासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती करत होती. या दरम्यान त्याची ओळख आशिषकुमार चौधरी नावाच्या तरुणासोबत झाली. त्याने प्रणवच्या सॉफ्टवेअर कंपनीत शिक्षणाकरीता सॉफ्टवेअर तयार करुन देण्याच्या नावाखाली 40 लाखांची फसवणूक केल्याती माहिती उघड झाली आहे. संबंधित प्रकार हा 2018 ते 2020 या कालावधी घडला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांची सॉफ्टवेअर कंपनी आहे. 2018 साली त्यांच्या विभागात राहणाऱ्या एका तरुणाने गुगलमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला, अशी माहिती समोर आली होती. ही माहिती मिळताच आमदार गायकवाड यांनी आशिष चौधरी या तरुणाचा सत्कार केला. आमदारांनी मुलगा प्रणव गायकवाड याच्या सॉफ्टवेअर कंपनीसाठी शिक्षणाकरीता लागणारे सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी आशिष चौधरी याला दिली.
आशिष याने सांगितले होते की, या सॉफ्टवेअरचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल. त्याने दोन वर्षात तयार केले सॉफ्टवेअर काही विद्यापीठे आणि कॉलेज घेत आहेत असं भासविले. मात्र असे काही नव्हते. आशिष याने फेक आयडी आणि अॅग्रीमेंटचे कागद तयार केले होते. थोड्याच दिवसात आशिष हा पसार झाला.
आमदारांच्या लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आशिषचा शोध सुरु केला आहे. लवकरात लवकर आशिषला अटक करण्यात यावी. त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार गायकवाड यांनी केली आहे.