वाशिम शाळा उभारणीसाठी पैसे न मिळाल्यामुळे आतेबहिणीने नवर्‍याच्या मदतीने भाचीचा केला खून

वाशिम:– शाळा उभारणीसाठी पैशाची मागणी केल्यानंतर पैसे न मिळाल्यामुळे आतेबहिणीने नवर्‍याच्या मदतीने भाचीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. आठ महिन्यांपासून गायब असलेल्या वैष्णवीला कोल्ड्रींक्समध्ये गुंगीचे औषध देवून गळा दाबला व नंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत जाळून टाकल्याची कबुली माधुरी गोटे व बद्रीनारायण गोटे यांनी पोलिसांना दिली.
त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून बेपत्ता असलेल्या येथील शासकीय कंत्राटदार विजय जाधव यांची १४ वर्षीय मुलगी वैष्णवीच्या बेपत्ता होण्याचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असले तरी केवळ पैशाच्या मोहापायी खुद्द वडिलांच्या आतेबहिणीनेच वैष्णवीचा जीव घेतल्याचे दुर्दैवी वास्तव व नातेसंबंधातील गुन्हेगारी मानसिकतेचा क्रूर चेहरा समोर आला.
गेल्या आठ महिन्यापासून बेपत्ता झालेल्या वैष्णवीचा काहीतरी सुगावा लागेल, ती सुखरुप सापडेल अशी आशा असलेल्या तिच्या आईवडिलांच्या आशाही वैष्णवीच्या प्रेतासोबतच मातीत मिसळल्या असून निरागस वैष्णवीचा अशा दुर्देवी हत्येमुळे वाशिम जिल्हा हळहळत आहे. वैष्णवीचे अपहरण, हत्या आणि पोलिसांचा तपास आणि आरोपींना झालेली अटक याबाबतची सविस्तर माहिती १४ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संदीप मोतीराम जाधव ( रा.वसारी हल्ली,माधवनगर लाखाळा) यांनी २० जानेवारी २०२० रोजी तोंडी तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांचे मोठे भाऊ विजय जाधव व पत्नी आशा, मुलगा शिवम (वय १९) मुलगी वैष्णवी (वय १५) यांच्यासह त्यांचे सासरे शालीग्राम खडसे व सासू हे सर्व लाखाळा येथे एकत्र राहत होते. विजय जाधव यांना किडनीचा त्रास असल्याने ते पत्नीसह गुजरात येथे उपचारासाठी गेले होते.
पीडित मुलगी ही स्थानिक हॅप्पी फेसेस शाळेत ९ व्या वर्गात शिकत होती. १९ जानेवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास संदीप जाधव हे घरी आले असता पीडित मुलगी घरात दिसली नसल्यामुळे त्यांनी विचारपूस केली व परिसरात शोध घेतला. मुलीच्या मोबाईलही बंद होता. त्यानंतर पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक पवन बन्सोड यांच्याकडे दिला.
प्रारंभी मुलीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करण्यात आला. त्यानंतर वाशीम शहर, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व स्थानिक गुन्हे शाखा अशी वेगवेगळी तीन पोलिस पथकेही तयार करुन महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, शिर्डी, नाशिक, अहमदनगर, महाराष्ट्राबाहेर हैदराबाद, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील तपास करण्यात आला. परंतु तपासाला योग्य दिशा मिळाली नाही. सायबर टिमच्या वतीनेही याबाबत तांत्रिक तपास करण्यात आला. परंतु कोणताही सबळ पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे तपासाची दिशा बदलुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिला माधुरी बद्रीनारायण गोटे (वय.२,रा. अमानी ता. मालेगाव) हिच्यावर तपास केंद्रीत करुन तिची वारंवार चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान तीने तपासात कबुल केले की, तिने व तिचा पती बद्रीनारायण गोटे यांनी पैशाच्या मागणीवरुन अपमानास्पद वागणूक दिल्याचा राग मनात ठेवून संगनमत करुन पीडित मुलीला १९ जानेवारी रोजी तिच्या राहत्या घरातून फिरायला जातो म्हणून घेवून गेले. मुलीचे अपहरण केल्यानंतर कोल्ड्रींकमध्ये गुंगीचे औषध टाकून चारचाकी वाहनाने तीला ग्राम मोहजा फाट्यावरुन शिरपूर मार्गे अकोला रस्त्याने वांगी ते रिधोरा रस्त्यावर असलेल्या हनुमान मंदिराजवळ गळा दाबुन जिवे मारले. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत जाळून टाकल्याची कबुली आरोपींनी दिली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना तपासासाठी ताब्यात घेतले असून पीडित मुलीचे हाडांचे अवशेष पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात आणखी कोणाचा समावेश आहे का? याबाबतही पोलिसांचा तपास सुरु असल्याची माहिती तपासी अधिकारी डॉ. पवन बन्सोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. पवनकुमार बन्सोड, पोलिस निरिक्षक शिवाजी ठाकरे व त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here