*नागपुर चॉकलेट आणि पतंग बहाण्याने केले चिमुकल्याचे अपहरण; नेपाळमध्ये विकण्याचा होता प्लॅन*

अपहरणाची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी नागपुरच्या मोठा ताजबाग परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी फारुक ऊर्फ बम्बय्या इब्राहिम खान (नेपाळ) याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला

नागपूर : चॉकलेट आणि पतंग देण्याच्या बहाण्याने युवकाने मित्राच्याच तीन वर्षीय मुलाचे अपहरण केले. त्या मुलाला घेऊन आरोपीने मध्यप्रदेशात पळ काढला. त्याला नेपाळमध्ये नेऊन विकण्याचा आरोपीचा बेत पोलिसांनी उधळला. अपहरणकर्त्या आरोपीला मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही अपहरणाची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी मोठा नागपुरच्या ताजबाग परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी फारुक ऊर्फ बम्बय्या इब्राहिम खान (नेपाळ) याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अदनान समीर शेख शब्बीर, असे अपहृत मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदनान याचे आई, वडील कचरा वेचण्याचे काम करतात. ते मूळ नांदेड येथील असून मार्च महिन्यात नागपुरात आले. अदनानसह ते मोठा ताजबाग समोरील फुटपाथवर राहायला लागले. याच ठिकाणी आरोपी फारुकही राहायचा. त्याने अदनान याची आई फिरदोस फातिमा शेख शब्बीर यांच्यासोबत ओळख केली. सोमवारी तो फातिमा यांच्यासोबत बोलला. चॉकलेट आणि पंतग घेऊन देण्याच्या बहाण्याने फारुख याने अदनान याला सोबत नेले.
दोन तास झाल्यानंतरही अदनान परतला नाही. फातिमा यांनी शोध घेतला. अदनान व फारुख आढळले नाही. फातिमा यांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी फारुक याचा शोध सुरू केला. तो अदनान याला घेऊन मध्यप्रदेशात असल्याची माहिती आहे. सक्करदरा पोलिसांचे पथक मध्यप्रदेशकडे रवाना झाले आहे.
अदनानच्या आईशी आरोपी फारूखने मैत्री केली. पती दिवसभर कचरा वेचण्यास जात असल्यामुळे ती फारूखसोबत फिरत होती. दरम्यान फारूखशी तिचे नाते घट्ट झाले. दोघेही एकमेकांना वेळ देऊ लागले. एवढ्यात मात्र तिच्या नवऱ्याने फारूखपासून अंतर ठेवण्याचा सल्ला पत्नीला दिला. मैत्री तोडल्याचा राग फारूखला आला. त्यामुळे त्याने मुलाचे अपहरण केल्याची चर्चा आहे.
फारूख हा मुळचा नेपाळ देशातील तिंगतौलिया शहरातील रहिवाशी आहे. त्याने अपहृत मुलाला इंदोरला नेले. तेथून दिल्ली जाणाऱ्या बसची तिकिट बूक केली होती. त्यामुळे तो मुलाला नेपाळला नेणार होता. फारूखने नागपुरातील हॉटेल कोहीनूरमध्ये काम केले आहे. त्याला इंदोर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
अपहृत मुलाचा शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आले आहेत. त्यापैकी एक पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आहे. अपहृत मुलाला सुखरूप परत आणणार आहोत. लवकरच आमचे पथक मुलाला घेऊन नागपुरात परततील.
– सत्यवान माने,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सक्‍करदरा नागपुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here