वर्धा जिल्हात पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले, बळीराजा सुखावला.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा,दि.21 जुलै:- वरुणराजाने गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतीपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू होती. काही भागात सिंचनाच्या माध्यमातून पिकांना जगण्याचा आधार दिला जात होता. अशातच रात्रीपासून वरुणाची कृपादृष्टी झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही काहीसा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे समुद्रपूर तालुक्यात १७.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतशिवारात पाणी साचले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. सेलू तालुक्यातील बोर नदीला पूर आल्याने जयपूर येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या गावातील नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. त्यांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही ठिकाणी निर्माण झाली होती. सायंकाळी सुरु झालेल्या पावसामुळे सिंदी-दहेगाव मार्गावरील पिपरा गावातील नाल्याला पूर आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळेपर्यंत ठप्प झाली होती. थोडाही पाऊस आला तरी या नाल्याला पूर येत असल्याने नांगरिकांसह शेतकऱ्यांना दरवर लागतो. येथील नारिकांनी अनेकदा या जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने समस्या कायम आहे. आतातरी ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.
कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान झळकत होते. या पावसामुळे शेतशिवारातील विहीर, नदी, नाले व तलावाच्या पाणीपातळीतही भर पडली आहे. तसेच या पावसामुळे मेडीकल चौकात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. या पावसातून वाहन काढताना ते आडवे होत होते. या साचलेल्या पाण्यामुळे किरकोळ अपघात होऊन अनेकांच्या अंगावर चिखल उडाल्याने संतापही व्यक्त होत होता.