*महिलांनी दारूबंदी दारूविक्रीविरोधात पुकारला एल्गार*
भंडारा:- तुमसर तालूक्यातील वैनगंगा नदी काठावरील तामसवाडी येथे बनावटी व गावठी दारूविक्रीचे अनेक अड्डे आहेत. गावात खुलेआम दारूविक्री करण्यात येते. पोलिसांच्या उपस्थितीत गावातील दारूविक्रेत्यांच्या घरी महिलांनी धडक मोहीम राबवली. मोहफूल दारू आणि साहित्य जप्त करण्यात आले तामसवाडी येथे जप्त केलेली दारू व साहित्याची चौकात होळी करण्यात आली.
तुमसर तालुयातील पूरग्रस्त तामसवाडी गावात महिलांनी मोहफूल दारू विक्रीविरोधात एल्गार पुकारला आहे. गावात विक्रेत्यांच्या घरून दारू आणि साहित्य जप्त करून त्याची गावातील चौकात होळी करण्यात आली. त्यामुळे महिलांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
वैनगंगा नदी काठावरील तामसवाडी येथे मोहफूल दारूविक्रीचे अनेक अड्डे आहेत. गावात खुलेआम दारूविक्री करण्यात येते. दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गावातील तरुणांत दारूचे व्यसन असल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. नदी काठावर व शिवारात मोहाच्या दारूचे गाळप होते.
*दारूमुळे भांडणे वाढली*
यामुळे शांतप्रिय गावात लहानसहान कारणावरून भांडणे वाढली आहेत. त्यामुळे गावातील शांतता भंग होताना दिसून येते. यासंदर्भात महिला मंडळ आणि महिला बचतगटाच्या महिलांनी बैठक आयोजित केली. यानंतर दारूविक्री बंद करण्याची ताकीद देऊन पोलिसांना माहिती देण्यात आली.
परंतु, दारू विक्रेते ऐकत नव्हते. यामुळे सरपंच बेबीताई ठाकरे यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले. गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय महिलांनी घेतला. या बैठकीत ग्रामपंचायत सदस्या वंदना बनकर, सुनीता इटनकर, बेबी बाभरे, कविता इखार, पंचफुला इखार, ऊर्मिला इखार, सरस्वता मोहोतकर, पुष्पा बनकर, कला इखार, सुनीता बनकर, बाया हेतकुरे, कुसुम बारबैले, गया हेतकुरे, सविता इखार, लीना इखार, रिता इखार आदी महिलांनी दारू विक्रेत्यांच्या विरोधात जोरदार मत मांडले. त्यांना गावकऱ्यांनी साथ दिली.
पोलिसांच्या उपस्थितीत गावातील दारूविक्रेत्यांच्या घरी धडक मोहीम राबविण्यात आली. मोहफूल दारू आणि साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्याची चौकात होळी करण्यात आली. महिलांचे धाडस पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. गाव करी ते राव न करी, या म्हणीची प्रचिती आली आहे. आता परिसरातील महिला दारू विक्रेत्यांच्या विरोधात अनेक गावात चळवळ वाढवणार आहेत.