आसाम - मिझोराम राज्यांच्या सीमारेषेवरील संघर्षात ६ पोलिसांचा मृत्यू

१५० वर्षांपासून चाललेल्या आसाम – मिझोराम राज्यातील सीमावादाला हिंसक वळण

Assam Mizoram border conflicts
आसाम – मिझोराम राज्यांच्या सीमारेषेवरील संघर्षात ६ पोलिसांचा मृत्यू

मनोज कांबळे
मुंबई दि. २७ जुलै २०२१: सोमवार २६ जून रोजी आसाम आणि मिझोराम राज्यांच्या सीमारेषेवरील बाराक घाटी परिसरात आसाम आणि मिझोरममधील पोलीस दल आणि सामान्य नागरिकांमध्ये संघर्ष झाला. या वेळी सहा पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर कछारच्या पोलिस अधीक्षकांसह ५० पोलिस कर्मचारी जखमी झाले. या घटनेत महाराष्ट्रातील IPS अधिकारी वैभव निंबाळकर जखमी झाले असून सध्या ते आयसीयू मध्ये दाखल झाले आहेत. सोमवारी सीमेवर दोन्ही बाजूंचे नागरिक आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सीमावाद मिटवण्याबाबत चर्चा सुरू होती. पण अचानक आंदोलकांनी गोळीबार सुरू केला आणि असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

आसाम आणि मिझोरम मधील सीमावाद कसा सुरु झाला?

ब्रिटिशांच्या काळात मिझोराम राज्य हे आसाम राज्यामध्ये लुशाई हिल या नावाच्या जिल्ह्याच्या रूपाने अस्तित्वात होते. पुढे मिझोरामला आसाम राज्यातून वगळून स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. यावेळी दोन्ही राज्यातील सीमारेषा १९३३ साली समंत केलेल्या नियमानुसार आखण्यात आली ज्याला मिझोराम राज्याच्या प्रतिनिधिनीची सहमती नव्हती. कारण हे नियम बनवताना मिझोराम राज्याला विश्वासात घेतले गेले नव्हते. त्यामुळे आसाम आणि मिझोराम राज्यातील सीमारेषा हि १८७५ च्या नियमांनुसार ठरवण्यात यावी असं मिझोराम राज्याचं म्हणणं आहे. हेच या दोन राज्यातील सीमावादाचं मूळ कारण आहे.

आसाममधखील बराक घाटी परिसरातील कछार, करीमगंज आणि हाईलकांडीची 164 किमीची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. दोन्ही राज्यातील समझोता करारानुसार वादग्रस्त सीमा परिसर हा तटस्थ भूभाग म्हणून घोषित करण्यात आला होता. परंतु अनेकवेळा दोन्ही राज्यातील नागरिकांनी तिथे घुसखोरी करून झोपड्या बांधणं, शेती करण्यासारखे प्रकार केले जातात आणि मग त्यातून वारंवार वाद निर्माण होतात.
२०१८ साली मिझोराम राज्यातील शेतकऱ्यांनी वादग्रस्त भूभागात आरामासाठी एक लाकडी शेड उभारली होती. आसाम पोलीस आणि वनविभाग यांनी ती शेड बेकायदेशीर ठरवून तोडली होती. यावेळी शेतकरी, बातमी करणारे पत्रकार यांना मारहाण करण्यात आली होती.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये याठिकाणी एकाच आठवड्यात दोनदा मोठे वाद झाले होते. ज्यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले होते तर मिझोरामच्या शेतकऱ्यांच्या सुपारीच्या बागेला आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर आसामच्या पोलिसांनी मिझोरमच्या नागरिकांना या सीमेवर शेती करण्यासाठी बंदी आणली होती.

२६ जुलैला नक्की काय घडलं?

जुलैच्या १० तारखेला आसाम पोलिसांकडून मिझोराम राज्यातील कोलासीब जिल्ह्यातील बुराचेप येथील बांधकामावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचा उद्रेक २६ जुलैला हिंसेच्या स्वरूपात झाला. मिझोरमचे पोलीस महानिदेशक लालबियाकथांगा खिंगागते यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये वादग्रस्त भागात एटलांन नदीच्या जवळील भागात रात्री आठ झोपड्या आसाम पोलिसांकडून जाळण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर तिथे आसाम आणि मिझोरममधील पोलीस दल आणि सामान्य नागरिकांमध्ये मोठा संघर्ष घडून आला. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामगांथा यांनी आसाम पोलिसांच्या दोन तुकड्या आणि नागरिकांनी मिझोरममध्ये वॅरेनग्टे ऑटो रिक्षा स्टँडवर लाठीचार्ज करुन अश्रूधुराच्या कांड्या फोडल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं. तर दुसरीकडे तर मिझोरमच्या नागरिकांनी आसामच्या पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप आसाम पोलिसांकडून करण्यात आला आहे.

आसाम आणि मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे “ट्विटर वॉर”

दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. विशेषतः हि घटना घडण्याअगोदर दोन दिवसापूर्वीच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर- पूर्वेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सभा घेतली होती. त्यावेळी राज्यांमधले सीमावाद सामंजस्याने सोडविण्याचा ठराव पास करण्यात आला होता. मिझोराम आणि आसाम या दोन्ही राज्यात भाजपा सत्तेमध्ये सामील आहे. तरी दोन्ही राज्यातील प्रशासन सीमावाद शांततेत सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. याउलट हिमंता बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सीमावादातील संघर्ष वाढला असल्याचं याविषयावरील तज्ज्ञ लोक सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here