नागपुर रामबागमध्ये गँगवॉर भडकले रॉकेलचे टेंभे पोलिसांवर भिरकावले

58

*नागपुर रामबागमध्ये गँगवॉर भडकले रॉकेलचे टेंभे पोलिसांवर भिरकावले*

पूर्वीच सज्ज असणाऱ्या पोलिसांनी त्यांना अटकाव घालण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपींनी त्यांना विरोध सुरू केला. अचानक पोलिसांच्या दिशेनेच दगड, फरशीचे तुकडे, रॉकेलचे टेंभे भिरकावले. फरशीचा तुकडा लागल्याने शिपाई स्वप्निल निकोसे जखमी झाले.
नागपूर : आज नागपुरमध्ये गुन्हेगारीचे विश्व खुप वाढले असल्याचे दिसत आहे. गुन्हेगारी गँगवॉरसाठी कुख्यात असलेल्या रामबागेत पुन्हा भिकू राजा व गन्नी वासनिक यांच्या टोळ्यांमधील वितुष्ट टोकाला पोहोचले आहे. वर्चस्वाच्या वादातून तीन दिवसांपासून त्यांच्यात धुसफुस सुरू आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, त्यालाही न जुमानता भिकू गँगने गुरुवारी पहाटे गन्नीच्या घरावर हल्ला चढवला. हल्लेखोरांना अटकाव केला असता त्यांनी दगड, फरशीचे तुकडे व रॉकेलचे टेंभे पोलिसांच्या दिशेने भिरकावले. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अनिकेत रामटेके (२६), उद्देश सोमकुवर (२१), अभिजित पाहुणे (२१), आदर्श जारोंडे (२१), हर्ष पैठणकर (१९), सागर लोखंडे (२०) अशी दोन्ही गटातील अटकेतील आरोपींची नावे आहेत. भिकू राजा व गन्नी वासनिक यांच्या टोळ्यांमध्ये गेल्या काही काळापासून वर्चस्वाच्या वादातून संघर्ष सुरू आहे. तीन दिवसांपासून वाद विकोपाला गेला आहे. सातत्याने जाळपोळ सुरू असल्याने या प्रकरणाशी संबंध नसणाऱ्यांच्या मालमत्तेचेही नुकसान सुरू आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गन्नी ऊर्फ पलाश वासनिक, सनी चव्हाण, विक्की दाभाडे २० साथीदारांसह हातात तलवारी घेऊन भिकू ऊर्फ राजा परसाके याच्या घरावर धडकले. आरोपींनी भिकू व त्याची पत्नी उषा यांच्या अंगावरून तलवार फिरवत त्यांना धमकावले सोबतच हत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
शिपाई स्वप्निल निकोसे जखमी
मध्यरात्रीनंतर तीन वाजताच्या सुमारास भिकू राजाचे साथीदार लाठ्या, फरशा, दगड व रॉकेलचे जळते टेंभे घेऊन जयंती मैदानाकडून गन्नी परसाकेच्या घरावर चाल करून गेले. पूर्वीच सज्ज असणाऱ्या पोलिसांनी त्यांना अटकाव घालण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपींनी त्यांना विरोध सुरू केला. अचानक पोलिसांच्या दिशेनेच दगड, फरशीचे तुकडे, रॉकेलचे टेंभे भिरकावले. फरशीचा तुकडा लागल्याने शिपाई स्वप्निल निकोसे जखमी झाले.
सहा आरोपींना अटक
आरोपींनी रॉकेलचे दिवे गन्नीच्या घरावर फेकले. यामुळे त्याच्या घराला आग लागून घरगुती सामान जळाले. हल्ल्याची पूर्वकल्पना असल्याने गन्नी घराला कुलूप लावून आपल्या परिवारासह इतरत्र निघून गेल्याने अनर्थ टळला. पण, आरोपींनी त्याच्या घरासमोर उभा ऑटो व दुचाकींची तोडफोड केली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.