राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख यांचे निधन.
राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख यांचे निधन.

राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख यांचे निधन.

राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख यांचे निधन.
राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख यांचे निधन.

ठळक मुद्दे
11 वेळेस आमदार झाल्याने वर्ल्ड गिनिज बूकात नोंद.
एकाच पक्षातून व एकाच मतदारसंघातून तब्बल 11 वेळा आमदार बनण्याची किमया.

==================

✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
मुंबई/सोलापूर,दि.30 जुलै:- शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी अकरा वेळा आमदार झालेले, अभ्यासू, संयमी व विशेषतः ‘जनसामान्यातील माणूस’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर 16 जुलैपासुन सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्या प्रकृतीत अनेकवेळा चढ-उतार सुरू होता काही वेळेस त्यांची प्रकृती चिंताजनकही बनली होती. आज शुक्रवार (ता. 30) रोजी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मावळली.

तळागाळातल्या माणसांच्या प्रश्नांप्रती असलेली गणपतरावांची तळमळ कणभरही कमी झाली नाही. 1972 च्या दुष्काळाचा काळ होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलापूरला भेट दिली, त्यावेळी वसंतराव नाईक वगैरेंच्यासोबत गणपतरावांनी विमानतळावर इंदिराजींची भेट घेतली. दुष्काळाशी संबंधित अनेक मागण्या त्यांनी इंदिराजींकडे केल्या. त्याचवेळी एक मागणी होती, समान काम समान दाम अशी. त्यावेळी पुरुषांना तीन रुपये आणि महिलांना अडीच रुपये मजुरी होती. गणतपतरावांनी ती समान करण्याची मागणी केली आणि इंदिराजींनी तिथल्या तिथे ती मंजूर केली. तळमळीचा हाच धागा घेऊन त्यांची वाटचाल सुरू राहिली.

गणपतरावांचे मूळ गाव मोहोळ तालुक्यातील पेणूर. वकिली करण्यासाठी ते सांगोल्यात आले. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात सुरू होती. सांगोला तालुक्यात भूमिगत राहून पत्रके वाटण्याचे काम त्यांनी केले. संपूर्ण तालुक्यावर काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. तशातच निवडणुका लागल्या. राऊत नावाचे विद्यमान आमदार होते. त्यांच्या विरोधात कुणी उभे राहायचे हा प्रश्न होता. उभे राहायचे म्हणजे हमखास पडायचेच होते. पडायचेच आहे, तर गणपतरावांना उभे करूया, असे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एका बैठकीत ठरले आणि गणपतराव विधानसभेचे उमेदवार बनले. निवडणुक प्रचार काळात अनेक गावांमध्ये गणपतरावांना लोकांनी येऊसुद्धा दिले नाही. अशा स्थितीत शक्य तिथे पोहोचून गणपतराव सभा घ्यायचे. एस. एम. जोशी, शंकरराव मोरे, आचार्य अत्रे वगैरेंच्या सभा ऐकून वक्तृत्व कमावले होते, त्याचा उपयोग होऊ लागला. लोक प्रत्यक्ष सभेला न येता लांबूनच त्यांचे भाषण ऐकायचे. लोकांचा प्रत्यक्षात प्रतिसाद न मिळालेल्या या पहिल्या निवडणुकीत गणपतराव निवडून आले, ते मराठा समाजाच्या मतांवर. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या गावांनी गणपतरावांना भरभरून मते दिली. सांगोल्यातील जनता त्यावेळीही जातीवर आधारित मते देत नव्हती आणि पन्नास वर्षानीही परिस्थितीत फरक पडला नाही. हा सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे श्रेय गणपतरावांच्याकडे जाते. निवडून आल्यानंतरचा त्यांचा सुरुवातीचा काळ मोठा खडतर होता. आमदार असले तरी सगळ्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व. त्यामुळे पंचायत समिती काही त्यांना जिंकता आली नव्हती. कारण पंचायत समितीसाठी ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान होते आणि तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात होत्या. बऱ्याच वर्षांनी त्यांना पंचायत समिती जिंकता आली.

सुरुवातीपासून सांगोल्यातील गरीब, कष्टकरी माणसांच्या मनात गणपतराव देशमुख हा आपला माणूस असल्याची भावना राहिली आणि त्याच भावनेवर ते साठेक वर्षे राजकारणात तगून राहिले. एकाच पक्षाकडून, एकाच मतदार संघातून तेरा निवडणुका त्यांनी लढवल्या. दोनवेळा त्यांचा पराभव झाला. एकदा मतदारसंघाच्या रचनेत काही बदल झाल्यामुळे ते हरले. किरकोळ मतांनी त्यांचा पराभव झाला,तरीही त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली नाही. त्यांच्या विरोधात मतदान करणारेही त्यांच्या पराभवाने दु:खी झाले आणि पुढची निवडणूक गणपतरावांनी मोठ्या फरकाने जिंकली. या मधल्या काळात देशात आणि महाराष्ट्रातही सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अनेक घटना घडल्या, परंतु सांगोला तालुक्यात अशा विषारी वाऱ्याने कधी शिरकाव केला नाही, कारण गणपतरावांचे नेतृत्व.

सामाजिक समतेच्याबाबतीत गणपतरावांनी कधी तडजोड केली नाही. सोलापूर जिल्हा परिषदेचे बाबा कारंडे नावाचे गणपतरावांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी गणपतरावांच्याविषयी एकदा सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. ‘गणपतरावांनी कधी जात-पात बघून उमेदवारी दिली नाही किंवा दुजाभाव केला नाही. मराठा, ब्राह्मण, होलार, चर्मकार अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी मिळते. मी लोणारी समाजाचा. मतदारसंघात माझ्या समाजाची नगण्य म्हणता येतील अशी मते आहेत. माझ्या विरोधात धनगर समाजाचा उमेदवार होता आणि तो गणपतरावांचा नातेवाईक होता. परंतु मी निवडून आलो, कारण गणपतरावांनी आत एक बाहेर एक असे राजकारण कधी केले नाही. आमदार निधीचे वाटप करताना लोकसंख्येच्या निकषांवर केले जाते. लोकशाही पद्धतीने समूहबैठका घेऊन, लोकांशी चर्चा करून विकासकामांबाबतचे निर्णय ते घेतात.’

राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी कोणतेही वैयक्तिक लाभ मिळवले नाहीत. राजकीय भूमिका घेतानाही कधी दुटप्पीपणा केला नाही. योग्य वेळी आघाडी आणि योग्य वेळी पक्ष असे व्यावहारिक निर्णय घेत पक्षही टिकवला आणि मतदारसंघावर वर्चस्वही राखले. जातीयवादी शक्तिंशी कधीही हातमिळवणी केली नाही. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली तेव्हा त्यांना पहिला पाठिंबा गणपतरावांनी दिला होता आणि पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा मानही ज्येष्ठत्वामुळे गणपतरावांना मिळाला होता.

ज्या तालुक्यात कापसाचे बोंडही उगवत नाही, तिथे गणपतरावांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली दोन सूतगिरण्या यशस्वीपणे चालवल्या. आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट सहकारी सूतगिरणी म्हणून सांगोल्याच्या सूतगिरणीची दीर्घकाळ ओळख राहिली. सांगोला तालुक्याच्या दुष्काळ निवारणासाठी त्यांनी खूप महत्त्वाचे काम केले. कृष्णा खोरे विकासाची पहिली मागणी गणपतरावांनी नागजला पाणी परिषद घेऊन केली होती. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबत त्यांनी दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी दीर्घकाळ चळवळी केल्या. भीमेच्या पाण्यावर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना त्यांनी यशस्वीपणे राबवली.

मतदारसंघात माणसे जोडणारे गणतपराव विधिमंडळातही आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. डाव्या पक्षांच्या नेत्यांप्रमाणे ते आक्रस्ताळे बोलत नाहीत किंवा समाजवाद्यांप्रमाणे विद्वतप्रचूरही नाही. परंतु त्यांच्या बोलण्यात सामान्य माणसांप्रती कळकळ असते आणि ठामपणा असतो. ते बोलायला उभे राहतात, तेव्हा सभागृह कानात प्राण आणून ऐकते. मतदारसंघात असो किंवा मुंबईत त्यांनी साधेपणा सोडलेला नाही. काही वर्षापूर्वी ते साताऱ्याहून पुण्याला येण्यासाठी एसटी बसमध्ये बसले. कंडक्टरने तिकिट मागितल्यावर आमदार आहे म्हणून सांगितले. कंडक्टरला विश्वास बसेना. कारण त्याच्या कारकीर्दीत आमदाराला एसटीत बसलेले त्याने पाहिले नव्हते. त्याने आगार व्यवस्थापकांना बोलावून आणले.

आणखी एक प्रसंग. सांगोल्यात त्यांच्याच संस्थेच्या एका महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापकांचे चर्चासत्र होते. त्याचे उदघाटन गणपतरावांच्या हस्ते होते. सभागृहाच्या बाहेर तीनशे रुपये घेऊन नोंदणी करण्यात येत होती. गणपतरावांना ते उशीरा समजले. उदघाटन समारंभ आटोपल्यावर अर्ध्या तासात त्यांनी तीनशे रुपये पाठवून दिले आणि स्वत:चीही नोंदणी केली.

गणपतराव हे आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार होते. शेतकरी कामगार पक्षाची संपूर्ण राज्यात वाताहत झाली असताना गणपतरावांनी मात्र भलत्या तडजोडी केल्या नाहीत. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा हातात धरूनच मतदारसंघही टिकवला. निष्ठा, चारित्र्य, सचोटी या बाबी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, परंतु मतदारांवरही त्याचे संस्कार केले. म्हणूनच मतदारसंघातील तिसऱ्या पिढीनेही त्यांना मतदान केले. गणपतरावांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने राजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here