यवतमाळ जिल्हात क्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

✒साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ,दि.31 जुलै:- यवतमाळ जिल्हातील आर्णी शहरातील माहूर चौक आणि मुबारकनगर परिसरात भारत विरुद्ध श्रीलंक टी-20 क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनद्वारे सट्टा चालविणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.
आर्णी येथे ऑनलाईन बेटिंग सुरू असल्याची माहिती सुत्राकडुन पोलिसाना मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, गजानन करेवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एकाच वेळी माहूर चौक येथील पीयूष दिलीप बजाज आणि मुबारकनगरमधील अशपाक शेख यांच्या ठिकाणावर छापा टाकला. यावेळी माहूर चौकातील दुकानाच्या वरच्या मजल्यावर दिलीप बजाज व निखील दिलीप बजाज हे दोघे सट्टा खेळविताना आढळून आले.
यावेळी एका ब्रिफकेसमध्ये हाॅटलाईनसह चार मोबाईल हॅन्डसेट, एक व्हाॅईस रेकाॅर्डर व एलईडी टीव्ही व इतर साहित्य असा एकूण एक लाख 93 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मुबारकनगरमध्ये अशपाक खालील शेख यांच्या राहत्या घरात छापा टाकला असता जावेद अमीन सोलंकी वय 40 वर्ष, मेहमूद अकबर सोलंकी वय 36 वर्ष अशपाक खालीख शेख वय 28 वर्ष, खालीख शेख मोहंमद शेख वय 50 वर्ष, शेख मकसूद शेख युनुस वय 19 वर्ष हे मोबाईल फोनद्वारे सट्टा घेवून जुगार खेळविताना आढळले. त्यांच्या ताब्यातून दहा मोबाईल, एक एलसीडी टीव्हीसह रोख 36 हजार 920 असा एकूण एक लाख 45 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई एपीआय गजानन करेवाड, विवेक देशमुख, अमोल पुरी, जमादार गजानन डोंगरे, विशाल भगत, उल्हास कुरकुटे, कविश पाळेकर, वंदना निचळे, ममता देवतळे आदींनी केली.