पोलिस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

56

*पोलिस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला*

हिंगणघाट:- तालूक्यातील वडनेर येथे पोलिस कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. समोर दोन व्यक्तींचे भांडण होत असेल तर ते सोडविणे माणुसकी आहे. त्यातच भांडण जर पोलिसासमोर होत असेल तर मग ते सोडविणे खाकी वर्दीची जबाबदारीच होते. परंतु दोन व्यक्तींचे होत असलेले भांडण सोडविणाऱ्या पोलिसावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला.
हिंगणघाट येथील पानटपरीलगत सुरू असलेले भांडण सोडविताना हटकल्याने दोन व्यक्‍तींनी एका पोलिस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. यात सदर कर्मचारी जबर जखमी झाला. अविनाश केशव वाळके असे जखमी पोलिस शिपायाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांची नावे संजय ज्ञानदेव गावंडे (वय 36) आणि अमोल कृष्णा मेघरे (वय 31) दोन्ही रा. वडनेर असे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या दोघांवर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अविनाश वाळके हे गुन्ह्याच्या तपासादरम्यान वडनेर रुग्णालयात गेले. येथे त्यांना रुग्णालयासमोरील एका बंद पानटपरीवर भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ते गेले असता भांडण करणाऱ्या व्यक्‍तींना त्यांनी हटकले असता यातील दोघांनी त्यांच्याशी शाब्दिक वाद केला. हा वाद विकोपाला गेल्याने यातील दोघांनी या कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला.
यात सदर कर्मचारी गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती त्यांनी पोलिस ठाण्यात देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी यावेळी मारहाण करणाऱ्या दोन्ही व्यक्‍तींना ताब्यात घेतले. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.