महाराष्ट्रात धोका वाढला, डेल्टा प्लसचे तीन वेगळे विषाणू सापडल्याने तज्ज्ञांच्या चिंतेत भर.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- कोरोना वायरसच्या दुस-या लाटेने मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला होता. आता राज्यात मोठ्या प्रमाणात करोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे चित्र मार्गावर दिसून येत आहे. मात्र एक महाराष्ट्राला हादळवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे करोना संक्रमणाचा धोका कायम असून या व्हेरिएंट समूहाच्या तीन वेगवेगळ्या विषाणूंनी तज्ज्ञांच्या चिंतेत भर घातली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या नव्या रुपाचा धोका जाणून घेण्यासाठी अभ्यासाची गरज असल्याचेही सांगितले जात आहे.
महाराष्ट्र राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे एकूण 66 रुग्ण असल्याची माहिती विषाणूच्या जिनॉम सिक्वन्सिंगद्वारे समोर आली. यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन विविध प्रकार आहेत. त्यांना Ay.1, Ay.2 आणि Ay.3 अशी नावे देण्यात आली आहेत. तज्ज्ञांनी डेल्टा प्लसच्या आणखी 13 उपवंशांचा शोध लावला आहे.
Ay.1, Ay.2, Ay.3 पासून त्यांची सुरुवात होते आणि हीच यादी 13 पर्यंत जाते. डेल्टा व्हेरिएंटचे म्युटेशन झाल्याने डेल्टा प्लसची निर्मिती झाली. डेल्टाच्या स्पाईक प्रोटिनमध्ये K417N नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाला.
मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. पूर्व मुंबईत एका 63 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. या महिलेच्या कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काही जणांना डेल्टाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यात एका 69 वर्षीय महिलेचा डेल्टामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय रत्नागिरीत 80 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.