नागपुर: एकलव्य निवासी शाळेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर दि.19 ऑगस्ट:- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छूक विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी एचटीटीपीएस कोलन हॅश ॲडमिशन डॉट ईएआरएस महाराष्ट्र डॉट कॉम या संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदनपत्र 31 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक सत्रातील गुणपत्रके सरल आयडीसह अपलोड करावे, असे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी कळवले आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून एकलव्य निवासी शाळेत प्रवेश दिला जातो. यावर्षी विभागांतर्गत 10 एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. या निवासी शाळेत इयत्ता सहावीमध्ये नियमित प्रवेश घेण्यासाठी व इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू आहे.
शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या तसेच इतर शासनमान्य अथवा खाजगी अनुदानित शाळेत शिकत असणारा कोणताही अनुसूचित जमातीचा विद्यार्थी आवेदनपत्र भरू शकेल. तसेच इयत्ता सहावीमध्ये प्रवेशसाठी अनुसूचित जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत 5 जागा आरक्षित असणार आहेत.
ऑनलाईन प्राप्त आवेदनातून विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेनुसार आणि पालकांच्या मुळ रहिवासाचा पत्ता विचारात घेऊन जवळच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेत उपलब्ध जागेनूसार प्रवेश देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प कार्यालय यांच्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन अपर आयुक्त आदिवासी प्रकल्प रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.