पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या गेटवर स्वतःला पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळे उपचारादरम्यान मृत्यू.

✒️MVN क्राईम रिपोर्टर ✒️
पुणे,दि.19 ऑगस्ट:- पुण्यात एक खळबळजनक बातमी समोर आली होती एका व्यक्ती ने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकुन स्वता:ला आग लावली होती त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली आहे.
चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या सुरेश विठ्ठल पिंगळे वय 42 वर्ष, रा. खडकी यांनी स्वत:ला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस आयुक्तालय कार्यालया समोर घडली होती. मात्र, घटनेनंतर उपचारासाठी तात्काळ त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मावळली आहे.
सुरेश पिंगळे यांनी स्वत:च्या हाताची नस कापून घेत ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून घेतले होते. त्यानंतर पेटलेल्या अवस्थेतच त्याने पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून गुन्हे शाखेच्या कार्यालयानजीक मंदिरापर्यंत धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांनी चादर आणि पोत्याच्या साह्याने त्याच्या अंगावरील आग विझवली. त्यानंतर त्याला तत्काळ पोलीस रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरेश पिंगळे कुटुंबीयासह खडकीतील आंबेडकर चौकात राहायला आहे. त्यांना खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून नोकरीची संधी मिळाली होती. त्यासाठी त्यांनी 1 जुलैला चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला. मात्र, पत्ता चुकीचा असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करून नव्याने सादर करण्याची सूचना करण्यात आली. दरम्यान, 22 जुलैला नामसाध्यर्म्यामुळे समर्थ, कोथरूड, सहकारनगर पोलीस ठाण्यांतर्गत पिंगळे विरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे संगणक प्रणालीत दिसून आले. त्यानंतर पुन्हा त्यांचा अर्ज पडताळणीसाठी पाठविण्यात आला. 27 जुलैला तक्रारींचे निवारण करून अर्ज स्वीकारण्यात आला.
दाखला मिळविण्यासाठी पिंगळे बुधवारी सकाळी पोलीस आयुक्तालयाबाहेरील तक्रार निवारण खिडकीजवळ आले. त्याठिकाणी त्यांच्या शंकेचे निरसन न झाल्याने त्यांनी हाताची नस कापून पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेतच पिंगळे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या इमारतीकडे पळत गेले. बंदोबस्तावरील कर्मचारी व गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी त्याच्यामागे धावत गेले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशामक दलाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पिंगळे यांची भेट घेतली होती.