पेट्रोलपंपाला नव्हे तर नियोजित जागेला भाजपचा विरोध

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा /हिंगनघाट सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पोलीस वेल्फेअरद्वारे पेट्रोलपंप तयार करण्यात येत आहे. पोलीस वेल्फेअरद्वारे होणाऱ्या पेट्रोलपंपाला भारतीय जनता पार्टीचा विरोध नसून ज्या ठिकाणी हा पेट्रोलपंप उभारला जात आहे तो परिसर आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आहे. शिवाय त्या ठिकाणी विविध राजकीय, सामाजिक आंदोलने होतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील पेट्रोलपंप इतर ठिकाणी हलविण्यात यावा. पोलिसांच्या पेट्रोलपंपाला आमचा विरोध नाही तर नियोजित जागेला भाजपचा विरोध आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. खा. पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर चौकाच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या परिसराचे सौंदर्यीकरण व्हावे म्हणून तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम सेवाग्राम विकास आराखड्यात समाविष्ट करून घेतले. सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाल्याने सध्या या परिसराचा चेहरा बदलला आहे. पोलीस वेल्फेअरद्वारे पेट्रोलंपपासाठी नाहरकत प्रमाणपत्र घेत असताना सर्व विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचीही एनओसी घेणे क्रमप्राप्त होते. परंतु, तसे झालेले नाही. भविष्यात डॉ. आंबेडकर चौकात होणाऱ्या सामाजिक, राजकीय, समाजप्रबोधन कार्यक्रमांना या पेट्रोलपंपामुळे नक्कीच बाधा होऊ शकते. त्यामुळे पेट्रोलपंपाची जागा तातडीने बदलण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. पंकज भोयर, किशोर दिघे, प्रमोद राऊत, मिलिंद भेंडे, प्रदीप ठाकूर, वरुण पाठक, मंजुषा दुधबडे, पवन परियाल, महेश आगे, नीलेश किटे आदींची उपस्थिती होती.