बीड जिल्हात कुऱ्हाडीने वार करून जन्मदात्या पित्याची मुलाने केली हत्या.

✒️श्याम भुतडा✒️
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड :- बीड जिल्हातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीककर्ज काढण्यावरून पिता-पुत्रात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात मुलगा व वडील दोघेही जखमी झाले. मात्र, बेशुद्धावस्थेत वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे 23 ऑगस्ट रोजी घडली. दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी पित्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा कांगावा करत सकाळी घाईघाईने अंत्यसंस्कार उरकण्यात आले. सूत्राकडुन पोलिसांना माहिती मिळाली आणि कारवाई करत पोलिसांनी दोन मुलांसह तीन भाऊ अशा पाच जणांना अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, महादेव बलभीम औटे वय 60 वर्ष रा. पारनेर असे मयताचे नाव आहे. औटे कुटुंबाला 12 एकर शेती आहे. महादेव यांना पीककर्ज उचलायचे होते, पण ते फेडायचे कोणी यामुळे मुलगा योगेश याचा त्यास विरोध होता. महादेव औटे हे मात्र पीककर्ज काढण्यावरून ठाम होते. दरम्यान, याच कारणावरून 24 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता त्यांच्यात घरी शाब्दिक वाद झाला. यावेळी घरातील इतर लोक शेतात होते. वाद वाढत गेला. दोघेही एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावले. ते दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर मुलगा योगेश याने जन्मदात्या वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. प्रत्युत्तरादाखल महादेव यांनीही योगेशवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात योगेशच्या पाठीत व डाव्या हाताच्या दोन बोटांबर खोल जखम झाली. यानंतर वडील महादेव हे आपल्या खोलीत गेले. दरवाजा बंद करून ते झोपी गेले. इकडे योगेशने बीडमध्ये खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. सायंकाळी घरातील इतर मंडळी शेतातून परतली; पण त्यांनी नित्याप्रमाणे बलभीम हे झोपले असावेत म्हणून दुर्लक्ष केले.
रात्री 11 वाजताच्या सुमारास योगेश घरी परतला तेव्हा पिता-पुत्रात वाद झाला होता ही बाब समोर आली. त्यांनी महादेव यांना आवाज दिला असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. फटीत हात घालून कडी उघडून पाहिले तेव्हा ते मयत आढळले. हवालदार आदिनाथ तांदळे यांच्या फिर्यादीवरून मुलगा योगेश महादेव औटे, गणेश महादेव औटे, भाऊ वाल्मीक बलभीम औटे, परमेश्वर बलभीम औटे, विष्णू बलभीम औटे यांच्यावर खून, पुरावा नष्ट केल्याच्या कलमाखाली पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपअधीक्षक विजय लगारे, पोलीस निरीक्षक मणेश पाटील यांनी भेट दिली.