सरकार उठली गरीबाच्या जीवावर, उज्वलाची गॅस देऊनही करावा लागत आहे चुलीवर स्वयंपाक.

✒मुकेश चौधरी✒
सहसंपादक, मिडिया वार्ता न्यूज
7507130263
वर्धा,दि.28 ऑगस्ट :- कोरोना वायरसच्या महामारीने आधीच गरीब मरत आहे. त्यात आता महागाई वाढवुन सरकार गरिबी संपवता संपवता संपुर्ण गरीबाना संपवत असल्याचे दिसून येत आहे. गरीब दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच जंगलतोडी व चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यात सरकार गरीब परीवाराच्या जीवावर उठल्या सारखे वागत गॅसचे भाव गगनाला भिडवल्याने तसेच सबसीडीही जवळपास बंदच केल्याने उज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत वर्धा जिल्हातील हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी, सेलु, सिन्दी रेल्वे, समुद्रपुर, आष्टी आणि वर्धा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर्सचे वितरण करण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस सिलिंडर्सचे दर गगनाला गेल्याने धूरमुक्तीची घोषणा हवेत विरली आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे गरीब परीवाराचे घरचे ‘बजेट’ संपुर्ण कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना गोरगरीब व अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मोफत मिळाले. काही महिने सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडी मिळत नसल्याचे चित्र आहे. जानेवारी 2021 मध्ये हे दर 699.50 रुपयांवर पोहचले. त्यानंतर या महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी 2021 मध्ये सिलिंडरचे दर 789.50 नंतर मे व जून 2021 महिन्यात 860 ते 900 रुपयांवर पोहचले आहेत.