तोहोगावात गोशाळेच्या गोरक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह शेकडो जनावरांची समस्या ऐरणीवर प्रशासनाचे दुर्लक्ष, कारवाईची मागणी

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- तालुक्यातील तोहोगाव येथे मागील पंधरा दिवसापासून जंगलाच्या शेजारी विना परवानगीने गोशाळा सुरू करण्यात आली असून त्यातील जनावरांची बिकट अवस्था पाहून गोशाळेच्या नाववर व्यापार सुरू आहे की काय असा सवाल गावकर्यानी उपस्थित केला आहे.सदर गोशाळेची चौकशी करून गोरक्षकवर कारवाई करून तेथील जनावरे प्रशासनाने ताब्यात घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी सदर गोशाळा कोठारीत विनापरवानगीने भर वस्तीत सुरू करण्यात आली होती.याबाबत गावकर्यानी ग्रा प कडे तक्रार केली याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर गोरक्षकांनी तडकाफडकी कारवाईच्या भीतीने तोहोगावात पलायन केले.गोरक्षाकच्या पलायन वृत्तीने वादळ उठले असून गोशाळेच्या नावाखाली जोपासली जाणारी व्यापारी वृत्तीही ऐरणीवर आली आहे. सदर खासगी स्वरूपातील गोशाळा समाजसेवेच्या नावाखाली व्यवसाय सुरू केल्याचे आढळून येत आहे. या गोशाळेत १५० ते २०० जनावर असून त्यांचे चारा,पाणी,संरक्षन,आरोग्य व संगोपन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत आहे. गोशाळा म्हणजे नेमके काय, किती गाईंचा सांभाळ केला म्हणजे त्यास गोशाळा म्हणता येईल, ती चालविण्यासाठी परवानगीची गरज आहे काय? अशी कोणतीही व्याख्या नसल्याने सदर मंडळ किंवा धार्मिक संस्थेने गोशाळेचा टिळा लावला आहे. परंतु, गोशाळेत गोसंवर्धन आणि संगोपनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक असून व्यापारीकरणाचा अतिरेक होत असेल तर कारवाई होणे गरजेचे आहे.
तोहोगावात कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या चालविल्या जात असलेल्या गोशाळेत दोनशेच्या आसपास पशुधन असून त्यांचे योग्यरीत्या देखभाल,संगोपन होत नसल्याने अर्धेअधिक पशुधन बिमार आहेत.त्यांच्या आरोग्याची तपासणी,उपचार करण्यात येत नाही.त्यांना राहण्यासाठी शेड नाही,स्वच्छता नाही सर्वत्र दुर्गंधीयुक्त वातावरण ,चिखलमय जागेत पशुधन दिवस रात्र सतत उभे असतात.त्या ठिकाणी बसू शकत नाही .आशा गंभीर अवस्थेत गोशाळेत पशुधन मरणाच्या दारात अखेरची घटका मोजत आहेत.या गोशाळेची दखल घेण्याऐवजी प्रशासनातील अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत कसे ? या संस्थेकडे पशुधन कुठून आले? पशुधनास मूलभूत सुविधा का दिल्या जात नाहीत.गोशाळा चालविण्याची परवानगी असेल तर तक्रारीनंतर गाव बद्दलविण्याची गरज काय?आदी प्रश्न उपस्थित होत असून संबंधित अधिकारी कारवाईसाठी कुणाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत.