नागपूरात महिला वकिलाला पोलिसांकडुन मारहान
नागपुर:- पुलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्त्या अॅड. अंकिता शाह यांना मारहाण केली. लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेची समाजमाध्यमांवर सोमवारी चित्रफित व्हायरल झाल्याने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मारहाण केल्याची लिखित तक्रार शाह यांनी नागपुर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली आहे. आता पोलिस आयुक्त काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
अॅड. अंकिता शाह यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २४ मार्चला दुपारी १ वाजता त्या आपल्या पतीसह श्वानांना अन्न व पाणी देण्यासाठी घरासमोर गेल्या. यावेळी करण सचदेव यांनी पात्राला लाथ मारली. दुसऱ्या दिवशी २५ मार्चला सायंकाळी पुन्हा करण याने शाह यांच्यासोबत वाद घातला. अॅड. अंकिता शाह या पतीसह लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये गेल्या. यावेळी पोलिसांनी तक्रार घेण्यास मनाई करीत वाद घातला. त्यानंतर पोलिसांनी शाह यांना मारहाण केली. बळजबरीने त्यांना ओढत पोलिस स्टेशनमध्ये नेले. या घटनेची शाह यांनी पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली. माहितीच्या अधिकारांतर्गत पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मागितले. पोलिसांनी फुटेज देण्यास नकार दिला. अपिलमध्ये गेल्यानंतर पोलिस उपायुक्तांनी फुटेज देण्याचे आदेश दिले. शाह यांना रविवारी हे फुटेज प्राप्त करून देण्यात आले.
सोमवारी ही चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. अंकिता शाह यांनी याप्रकाराची पोलिस आयुक्तांसह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली. पोलिस निरीक्षकांसह त्यावेळी उपस्थित असलेल्या सात अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही शाह यांनी तक्रारीत केली आहे. याबाबत विचारणा केली असता लकडगंज पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे म्हणाले, ‘मार्च महिन्यात करोनाचा प्रादूर्भाव होता. सतरंजीपुरा हॉटस्पॉट होता. शाह यांच्या पतीने मास्क लावले नव्हते. पोलिसांनी त्यांना मास्क घालण्याची विनंती केली. शाह हे मोबाइलद्वारे रेकॉर्डिंग करायला लागले. पोलिसांनी मनाई केली असता शाह दाम्पत्याने पोलिसांसोबतच वाद घातला. वाद मिटविण्याचा आपण प्रयत्न केला. यात झटापट झाली. या प्रकरणाची आधीच चौकशी झाली आहे.’