अष्टविनायका तुझा महीमा कसा, वाचा मिडिया वार्ता न्युज वर.
मिडिया वार्ता न्युज घेऊन येत आहे गणपतीच अष्टविनायक दर्शन आज पासून सर्व भक्तासाठी.

देशातभरात आज पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव म्हणजे छोट्या पासून ते थोर मोठ्या पर्यंत सर्वासाठी आनंदाची पर्वणी आहे. महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत म्हणजेच गणपती. कुठलेही कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात.
महाराष्ट्रातील अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे होय. ही अष्टविनायकाची आठही मंदिरे मनाला ताजतवाने करणा-या निसर्गरम्य अशा ठिकाणी आहेत. आज आपण या धावपळीच्या जीवनात या आठ गणपतीच्या प्रवित्र मंदिरांना भेट दिली तर आपल्या मनाला शांत आणि शिथिल वाटते.
अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो. ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली आहेत. ही आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून ती मनाला सुखावह वाटतात.
प्रसिद्ध अष्टविनायक दर्शन यात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन गणपतींच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. प्रत्येक अष्टविनायक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मुर्ती अदुत्तीय आणि विलक्षण आहेत. या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे. अष्टविनायक या आठही मंदीरातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते. या विविध देवळांमध्ये मोरश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची वेगवेगळी नांवे आहेत.
ही मंदिरे मोरगांव, रांजणगांव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड येथे वसलेली असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत. या 8 मंदिरांपैकी 6 ही पुणे जिल्ह्यात आणि 2 रायगड जिल्ह्यात असूनसुद्धा तुलनेने पुण्याहून जवळ पडतात.