*अखेर रियाला मिळाला दिलासा, जामीन मंजूर*
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालेल्या तपासामध्ये ड्रग प्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली होती. मागील काही दिवसांपासून रिया अटकेत होती. मात्र आज तिला दिलासा मिळाला असून मुंबई हायकोर्टाकडून तिचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.
रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
रियासोबत तिचा भाऊ शौविकलाही अटक झाली होती. मात्र कोर्टाने शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.
रियाची सुटका करताना कोर्टाने सांगितलं आहे की, ‘रियाने सुटकेनंतर दर १० दिवसांनी पोलीस ठाण्यात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसंच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं’.रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ‘अखेर सत्याचा विजय झाला आहे.आम्ही सादर केलेले पुरावे न्यायालयाने मान्य केले आहेत.
रियाची अटक आणि कोठडी ही असमर्थनीय आणि कायद्याच्या पलीकडे होती. सीबीआय, ईडी आणि एनसीबीने तिचा पाठलाग करणं आता थांबलं पाहिजे. आम्ही सत्याशी बांधील आहोत. सत्यमेव जयते’.
रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली ८ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं.याप्रकरणात तिची चौकशी सुरु होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी रियाला अटक करण्यात आलं होतं. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.