पत्नीशी झाला रागात चिरला तीन वर्षाच्या चिमुकल्याचा गळा.
बुलडाणा:- जिल्यातील घाटबोरी येथे अलिप्त राहणाऱ्या पत्नीसोबत झालेल्या वादानंतर जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतः धारदार शस्राने गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मेहकर तालुक्यातील भालेगाव शिवारात घडली.
या घटनेसंदर्भात जानेफळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल अवसरमोल हा मोळी (ता. मेहकर) येथील रहिवासी असून, त्याची पत्नी स्वाती गेल्या काही महिन्यांपासून अलिप्त राहत होती. स्वाती ही मेहकर तालुक्यातील गोमेधरमध्ये असल्याची माहिती अनिलला मिळाली होती.
त्यानुसार तो तेथे गेला व पत्नीला घरी येण्यासाठी विनवणी केली. मात्र तिने सोबत येण्यास नकार दिल्यामुळे रागाच्या भरात अनिलने आपल्या मुलाला पत्नीपासून हिसकावून घेतले. त्यानंतर त्याने मेहकर नजिक असलेल्या भालेगाव फाट्यावर येऊन पत्नीला फोन करून मी आता मुलाला ठार मारून स्वतः आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.
त्यानंतर भांबावलेल्या अवस्थेत अनिलने मुलाचा गळा चिरून जानेफळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिलीप मेश्राम यांना सर्व हकीकत सांगितली व मुलाला दवाखान्यात इलाज करण्यासाठी सांगितले. याचवेळी त्याने गळ्यावर वार करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीएसआय काकडे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी मुलाला मेहकर येथील रुग्णालयात गंभीर स्वरूपात भरती केले.
अनिलने देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पत्नी स्वाती अनिल अवसरमोल हिने जानेफळ पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिल अवसरमोल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जानेफळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिलीप मेश्राम व त्यांचे सहकारी करीत आहेत.
क्रुर मानसिकतेचा निरागस बळी
समाजातील क्रुरता वाढत आहे. टोकाच्या निर्णयापर्यंत जाणारी माणसिकता समाजासाठी घातक ठरत असल्याचे भालेगाव येथील घटनेवरून दिसून येते. पती-पत्नीच्या भांडणात अविचारीपणातून एका तीन वर्षांच्या निरागस बालकचा बळी देण्याचा प्रयत्न झाला. ज्याला स्वतःच्या भावनाही मांडता येत नाही अशा बालकाला स्वार्थाने बरबटलेल्या या समाजातील क्रुर मानसिकतेचा सामना करावा लागला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.