समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य : न्यायाधीश श्री औटी

68

समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य : न्यायाधीश श्री औटी

समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य : न्यायाधीश श्री औटी
समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य : न्यायाधीश श्री औटी

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961

गोंदिया : मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा मुलभूत अधिकार मानवी जीवनास मिळालेली अमूल्य देण आहे. जीवनात चांगले शिक्षण घेतले तर आपण उच्च पदापर्यंत जाऊ शकतो व त्याची समाजात प्रतिष्ठा वाढत असते. त्याचप्रमाणे चांगले आरोग्य राहण्यासाठी चांगल्या गुणांचा अवलंब केला तर आरोग्य सुदृढ राहते. चांगले आरोग्य हे एक चांगले व्यक्तीमत्वाचे गुण आहे. समाजातील तळागळातील लोकांना जे दीर्घ काळापासून गरीब व उपेक्षित आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी केले.
17 सप्टेंबरला भटके विमुक्त कल्याणकारी संस्था विदर्भ प्रदेश अंतर्गत ‘पालावरची शाळा’ मांग गारुडी वस्ती, शिवाजीनगर, कुडवा (गोंदिया) येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी न्या.औटी यांनी भटक्या विमुक्तांना शासनाच्या विविध योजनांची विस्तृतपणे माहिती दिली. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना शासनाच्या योजनांचा कसा लाभ घेता येईल याबाबत सविस्तर समजावून सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत विविध सेवा पुरविल्या जातात व त्या मोफत असतात, त्यामुळे त्या योजनांचा कसा लाभ घेता येईल याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
भटक्या विमुक्त लोकांना तसेच पालावरच्या शाळेतील मुलांना मार्गदर्शन करतांना मुख्या न्यायदंडाधिकारी एस.जे.भट्टाचार्य म्हणाले, आपण उद्याचे सुजान नागरिक आहात. त्यामुळे चांगल्या आचरणातून आपण मोठे व्यक्ती व्हावे, ज्यामुळे आपले नाव समाजात एक उत्तम उदाहरण म्हणून नावारुपास येईल. शिक्षणाचे महत्व पटवून सांगतांना ते म्हणाले की, शिक्षणाशिवाय जीवनाला अर्थ नाही. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत विविध प्रकारच्या मोफत सुविधा पुरविल्या जातात त्या सुविधांचा आपण लाभ घ्यावा. वाईट व्यसन लावून घेऊ नका. आज जर आपण भविष्य घडविण्यासाठी दहा वर्षे अथक परिश्रम घेतले तर आपले पुढचे पन्नास वर्षे हे सुखात जातील. जीवनामध्ये आपले करिअर घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणे हा सुखाचा मुलमंत्र आहे असे त्यांनी सांगितले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी सचिव एन.आर.वानखडे म्हणाले, संविधानामध्ये प्रत्येकाला मुलभूत अधिकार दिलेले आहेत तसेच मुलभूत कर्तव्ये सुध्दा दिलेली आहे. त्या मुलभूत अधिकारांबाबत सविस्तर माहिती देतांना सांगितले की, मानवाला जीवन जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे स्वाभिमानाने जगणे होय. तसेच संविधानामध्ये शिक्षण घेण्याच्या अधिकाराबाबत मुलांना वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावे व ही जबाबदारी शासनाची आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणे हे त्यांचे कर्तव्ये आहे व शिक्षण देवून त्यांना या देशाचा सुजान नागरिक बनविणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
भारताच्या स्वातंत्र्यास 75 वे वर्ष सुरु झाले असल्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ सुरुवात होणार. या निमित्ताने 8 ते 14 नोव्हेंबर 2021 हा आठवडा ‘विधी सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान गरीब व उपेक्षित लोकांना त्यांचे दिर्घकालीन समस्यांचे विधी विषयक मुद्द्याचे निराकरण करण्याकरीता विस्तृत प्रमाणात जनजागृती, विधी सहाय्य पुरविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 2 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत Pan India awareness and outreach campaign चालविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश-1 एस.बी.पराते, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, तहसिलदार आदेश डफळ, गट विकास अधिकारी दिलीप खोटेले, ॲड.हेमलता पतेह, ॲड.अर्चना नंदघळे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, पालावरच्या शाळेचे पलकत्व निर्मल बोरसे, कुडवा ग्रामपंचायत सरपंच शामदेवी ठाकरे व ॲड.प्रणिता कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.प्रणिता कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड.हेमलता पतेह यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.जी.बोरीकर, एम.पी.पटले, एन.एल.रंगारी, एल.पी.पारधी, बी.डब्ल्यू.पारधी, गुरुदयाल जैतवार, पी.एल.व्ही., कुडवा ग्रामपंचायतचे सरपंच शामदेवी ठाकरे, मांग गारुडी वस्तीतील प्रतिष्ठीत नागरिक तसेच पालावरची शाळेचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.