तीन अनाथांचा जीवन जगण्यासाठी संघर्ष सुरू
समाजातील दानशूर या अनांथाकडे ‘नाथ’ बनुन येतील अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे.
नांदेड :- जिल्ह्य़ातील देगलूर एकीकडे कोरोनाच्या महामारीचा सामना तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम मिळवण्यासाठीचा दररोजचा संघर्ष कांबळे कुटुंबियांचा सुरू होता. पदरात असणाऱ्या तीन मुलांचा कधी ‘बाप’ही तेच अन् ‘माय’ही तेच अशा भूमिका गेल्या पाच वर्षापासून निभावणाऱ्या दिलीप कांबळे रा.शहापूर यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या निधनाने जगण्यासाठी अनेक संकटावर मात करून सुरू असलेली कांबळे कुटुंबीयांची धडपड अखेर थांबली.
या घटनेने त्यांची तीन मुले ‘अनाथ’ बनली असून आता आपला ‘नाथ’ शोधण्यासाठी त्या तिघांची संघर्षाची बिकट वाट पुन्हा सुरू झाली. या घटनेने शहापूर परिसरातील समाजमन सुन्न झाले आहे. शहापूर येथील हातावर पोट असणाऱ्या दिलीप कांबळे यांच्या पत्नीचे गेल्या पाच वर्षापूर्वी निधन झाले. घरी शेती नाही उत्पन्नाचे दुसरे असे कोणतेही शाश्वत साधन नाही. पदरात तीन अपत्य, अशा कठीण प्रसंगातून ते मार्ग काढीत असताना त्यांना कधी बापाची, तर कधी ‘माय’ची भूमिका वठवावी लागत होती. हर्षवर्धन (वय १२), अनिकेत (वय १०), दत्ता (वय ८) यांना मुखेडच्या एका निवासी शाळेत शिक्षणासाठी प्रवेश दिला व ते मोल मजुरी करून स्वतःची उपजीविका गेल्या पाच वर्षापासून स्वतः भागवत होते. मात्र नियतीला तेही मान्य नसावे. गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे शाळाही बंदच आहेत. त्यामुळे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दिलीप कांबळे यांच्या खांद्यावर आली.
इकडे कोरोनामुळे हाताला कामही मिळेनासे झाले. त्यातही तीन मुलांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांची धडपड सुरूच असताना गुरुवारी त्यांनाही आजाराने गाठले, त्यातच दिलीप कांबळे यांचे निधन झाले. जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो याचेही आकलन या तीन मुलांना नसल्याने या घटनेने त्यांच्यावर प्रचंड मोठा आघात झाला. या तीन मुलांपुढे अनेक खडतर प्रश्नांची मालिका अभी टाकली असून ते समाजाकडे आशाळभूत नजरेने बघत आहेत. या दुखद घटनेने शहापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजातील दानशूर या अनांथाकडे ‘नाथ’ बनुन येतील अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे.