मिशन कवच कुंडल” यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज…!
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आढावा

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आढावा
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961
अलिबाग,जि.रायगड :- केंद्र शासनाने करोनाविरुद्धची लढाई अधिक तीव्र करण्यासाठी “मिशन कवच कुंडल” या विशेष मोहिमेद्वारे दि. 8 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत देशभरातील जवळपास शंभर कोटी जनतेचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करण्याचा संकल्प केला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत राबविण्यात आलेल्या कोविड-19 लसीकरण मोहिमेचा दूरदृश्यप्रणालीद्वारे सविस्तर आढावा घेतला. यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, डॉ.गजानन गुंजकर हे प्रत्यक्ष तर सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक हे ऑनलाईन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सर्वांना आवाहन केले की, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी मिळून एकमेकांच्या सहकार्याने ही मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवायची आहे. या मोहिमेत अद्याप लसीकरण न झालेल्या नागरिकांना पहिला डोस देण्यास प्राधान्य दिले जाणार असून प्रत्येक विभागाने ज्या नागरिकांनी अद्याप एकही लस घेतलेली नाही, अशा नागरिकांचे लसीकरण होण्याच्या दृष्टीने अत्यंत काटेकोर नियोजन करावे.
अपंग, वृद्ध, हालचाल करू न शकणारे रुग्ण, दुर्गम भागातील नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येईल, आपल्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनाही यात सहभागी करून घेऊन त्यांच्या सहकार्याने ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर म्हणाले की, शासनाकडून डोसेस व सिरिंजचा मुबलक प्रमाणात पुरवठा केला जाणार असून कोणत्याही परिस्थितीत ही मोहीम यशस्वी करणे, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.
बैठकीच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.बैनाडे यांनी “मिशन कवच कुंडल” बाबत प्रस्तावना करुन जिल्ह्यातील आतापर्यंतचे झालेले लसीकरण व प्रलंबित लसीकरण यांचा तालुकानिहाय संख्यात्मक आढावा घेतला.
रायगड जिल्ह्यात 1मार्च 2021 रोजीची अंदाजित लोकसंख्या 29 लाख 83 हजार 848 असून त्यापैकी 21 लाख 92 हजार 532 नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे.
कोविशिल्डचा पहिला डोस 14 लाख 97 हजार 311 तर दुसरा डोस 5 लाख 63 हजार 468 नागरिकांचा पूर्ण झाला आहे, असे एकूण 20 लाख 60 हजार 779 नागरिकांचे कोविशिल्ड लसीद्वारे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे कोवॅक्सिनचा पहिला डोस 1 लाख 16 हजार 991 तर दुसरा डोस 84 हजार 653 नागरिकांचा पूर्ण झाला आहे, असे 2 लाख 1 हजार 644 नागरिकांचे कोवॅक्सिन लसीद्वारे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
अशा प्रकारे दोनही लसीद्वारे एकूण 22 लाख 62 हजार 423 नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
एकूण लोकसंख्येपैकी पहिला डोस प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 5 लाख 78 हजार 230 असून दुसरा डोस प्रलंबित असलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 66 हजार 181 आहे.
दोन्ही लसींद्वारे लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 6 लाख 48 हजार 121 असून त्याची टक्केवारी 29.7 टक्के आहे तर किमान एक डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची टक्केवारी 73.63 आहे.