मानखुर्द रेल्वे स्थानकात प्रवाश्याची लुटमार करून हत्या

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. : 9768545422
मुंबई : मानखुर्द रेल्वे स्थानकावर शनिवारी पहाटे दिपक चंद्रकांत हिरे या तरुणावर चाकू हल्ला करून आरोपी पप्पु कुंजीने पळ काढला. या हल्ल्यात दिपकचा जागीच मृत्यू झाला आहे. या हत्येने मानखुर्द स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पप्पु कुंजीला अटक केली आहे. मात्र, रेल्वे प्रवासी दिपकच्या हत्येमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर जनतेकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरचा जुना रहिवासी असलेला दिपक हिरे काही वर्षांपासून नवी मुंबईतील खारघर येथे राहण्यास होता. दिपक कामानिमित्त खारघर स्टेशनवरून पहाटे ट्रेन पकडून लगेज डब्यात बसला. दिपक पहाटे मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यानंतर ट्रेन वाशी ते मानखुर्द स्टेशन दरम्यान आल्यानंतर आरोपीने त्याचाजवळील मोबाइल जबरदस्तीने हिसकावला. आरोपी हा मोबाइल हिसकावून मानखुर्द स्टेशन आल्यावर पळून जात होता. त्यामुळे दिपकने मानखुर्द स्टेशनवर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये झटापटी झाली. त्यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने दिपकवर हल्ला केला. त्यातच दिपकचा मृत्यू झाला.
हत्येच्या घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पप्पु कुंजीला अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या हत्येच्या घटनेमुळे मुंबई लोकलच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.