जेव्हा रक्षक बनतो भक्षक, वन समितीचा अध्यक्षच निघाला वाघांच्या अवयवांचा तस्कर.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442 📲
नागपूर:- जिल्हातील उमरेड येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वन विभागात सुरु असलेल्या वाघांच्या अवयवांची तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. जेव्हा रक्षकच भक्षक बनत असेल तर काय म्हणावे? होय, पण असे घडले आहे. वाघांच्या अवयवांची तस्करी प्रकरणात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षालाच अटक करण्यात आली आहे. राजू कुळमेथे असे आरोपीचे नाव असून अन्य चार व्यक्तींनाही अटक झाली आहे.
नागपुर जिल्हातील उमरेड बसस्थानकाजवळ वाघाच्या अवयवांची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार 23 नोव्हेंबरला वन विभागाच्या दक्षिण उमरेड वन परिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला आणि तीन आरोपींना अटक केली. अटक केल्यानंतर आरोपींची तपासणी आणि चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मेळघाट सायबर सेलच्या मदतीने आणखी दोन जणांना अटक केली.
वाघांच्या अवयवांची तस्करीमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ताराचंद महादेव नेवारे वय 41 वर्ष, राह. खडकळा, दिनेश कवटु कुंभले वय 30 वर्ष राह. वाढोणा, अजय भानारकर वय 24 वर्ष, वाढोणा, प्रेमचंद वाघाडे वय 50 वर्ष राह. सोनपूर, राजू कुळमेथे राह. खडकळा अशी आहेत. सर्वच आरोपी नागभीड जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या विरुद्ध वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक एन.जी. चांदेकर, वन परिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी कामगिरी केली.