राष्ट्रपिता महात्मा फुले, थोर भारतीय समाजसुधारक

✍🏽 लेखक: राज जाधव
📲8108339530📲
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली, शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुंबई येथे जनतेने १८८८ साली महात्मा ही पदवी बहाल केली.
मानवी हक्कावर १७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होता.
पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांची सत्ता भारतामधे आपली पाळंमुळं रोवु लागली. ब्रिटिशांच्या या सत्तेला १८४० मध्ये मुर्त स्वरूप मिळाले. ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती.
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. ऑगस्ट १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी – सावित्रीबाईंवर सोपविली. त्यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.
फुले म्हणतात ‘‘स्त्री अथवा पुरूष जे एकंदर सर्व गावच्या, प्रांताच्या, देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मताच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवड निवड न करणारे, या सर्व स्री पुरूषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करून वागावे. इतकेच काय, एकाच घरात बौद्ध धर्मी बायको, ख्रिस्त धर्मी नवरा, इस्लाम धर्मी कन्या व सार्वजनिक सत्यधर्मी पुत्र यांना प्रेमाने नांदायला लावील तोच खरा धर्म.’’ यात आर्थिक समता सूचित केली आहे आणि सर्वधर्मी समभाव स्वच्छ रीतीने मांडलेला आहे.
आर्य ब्राह्मण हे मूळचे इराणचे, त्यांनी भारत जिंकला आणि येथील तथाकथित शूद्रातिशूद्र शूर जमातींना जिंकून त्यांना धार्मिक कर्मकांडाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे सामाजिक व आर्थिक शोषण केले.
वेद हे ईश्वरनिर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत, असे जोतीरावांचे ठाम मत होते. वेदाने समाजात भेद पडले . म्हणून वेद म्हणजे भेद असे त्यांना वाटे. ब्राह्मणांच्या पोथीतील जातींच्या उत्पत्ती विषयीची कल्पना त्यांना मुळीच मान्य नव्हती. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय बाहुतून जन्मले, शूद्र त्याच्या पायातून निघाले हे विधान त्यांना भयंकर आणि धादांत असे वाटे. “मनुस्मृती” ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसविते म्हणून ती अपवित्र आहे, असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला आहे. भगवान बुद्धाविषयी जोतिरावांना नितांत आदर वाटे.
वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था या शोषण व्यवस्था असुन जोपर्यंत या पुर्णपणे नामशेष होत नाहीत तोवर एक समाजाची निर्मीती असंभव आहे अशी आपली रोखठोक भुमिका ठेवली. अशी भुमिका मांडणारे ते पहिले भारतीय होते आणि म्हणुनच जातिव्यवस्था निर्मृलनाची कल्पना आणि आंदोलनाचे ते प्रणेते ठरले. २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे निधन झाले.
विनम्र अभिवादन !!!